बॉलिवूडचा ‘दबंग’ हिरो सलमान खानला जानेवारीत जोधपूर येथील न्यायालयानं दिलासा देत बेकायदा शस्त्र बाळगल्याच्या प्रकरणातून दोषमुक्त केले होते. त्यावेळी सलमानला यापुढं न्यायालयाच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत, असं त्याच्या चाहत्यांना वाटलं होतं. पण सलमानचा ‘न्यायालयीन फेरा’ अद्यापही चुकलेला नाही. राजस्थान सरकारनं दंडाधिकारी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात जोधपूर जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळं आता जिल्हा सत्र न्यायालयानं सलमानला ६ जुलैपर्यंत न्यायालयात हजर राहावं, असे आदेश दिले आहेत.

सलमान खानविरोधात राजस्थानमधील जोधपूर येथील दंडाधिकारी न्यायालयात बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी खटला सुरू होता. जानेवारीत न्यायालयाने सलमानची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली होती. न्यायालयाच्या या निर्णयाला राजस्थान सरकारनं जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिलं आहे. या प्रकरणी ‘न्यायालयानं २० हजार रुपयांच्या जामीनासह सलमानने ६ जुलैपर्यंत व्यक्तिगतरित्या न्यायालयात हजर राहावं’, असे आदेश दिल्याची माहिती सलमानचे वकील हस्तमल सारस्वत यांनी दिली.

१९९८ मध्ये ‘हम साथ साथ है’ चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान कंकणीजवळ सलमान आणि त्याच्या सहकाऱ्यांनी काळविटाची शिकार केल्याचा आरोप होता. बिष्णोई समाजाच्या तक्रारीनंतर २ ऑक्टोबर १९९८ रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी चौकशी सुरू होती. त्याचवेळी सलमानच्या खोलीतून रिव्हॉल्व्हर आणि रायफल हस्तगत केली होती. त्यानंतर १२ ऑक्टोबरला सलमानला अटकही करण्यात आली होती. जोधपूर येथील दंडाधिकारी न्यायालयात या प्रकरणी खटला चालला. न्यायालयाने या प्रकरणातून त्याची सुटकाही केली होती. पण राजस्थान सरकारनं या निर्णयाला जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिलं आहे. आता सत्र न्यायालयानं सलमानला हजर राहण्याचे आदेश दिल्यानं त्याच्या अडचणींमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. सध्या सलमान आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. त्यामुळं आता व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून न्यायालयात हजर होतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.