चित्रचाहूल : उत्कंठावर्धक आठवडा..

सध्या टीआरपीच्या रांगेत ‘स्टार प्रवाह’ वाहिनी क्रमांक एकवर पोहोचली आहे.

निलेश अडसूळ

शिथिलीकरणानंतर ज्याप्रमाणे उद्योग-व्यवसायांना गती प्राप्त होत आहे तशीच काहीशी गती मालिका विश्वातील आशयाला प्राप्त झाली आहे. प्रत्येक वाहिनीवर सुरू असलेले दर्जेदार कथानक आणि महत्त्वाच्या टप्प्यामुळे प्रेक्षकांची अवस्था या वाहिनीवर जाऊ की त्या वाहिनीवर अशी झाली आहे. अर्थात हा बदल प्रेक्षकांच्या नजरेतून सुटण्यासारखा नाही त्यामुळे असा आशय पाहून प्रेक्षकांच्या मुखातूनही वाह.. वाह क्या बात! अशी दाद येत आहे.

सध्या टीआरपीच्या रांगेत ‘स्टार प्रवाह’ वाहिनी क्रमांक एकवर पोहोचली आहे. नवनवीन मालिका, प्रेक्षकांना भावेल अशी रंजकता यामुळे सगळ्याच मालिका लोकप्रिय ठरत आहेत. ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेतील किशोरी अंबिये यांनी साकारलेले ‘मामी’ हे पात्र अगदीच उठावदार ठरते आहे. ‘ढवळून टाकीन’ या त्यांच्या ब्रीदवाक्याचा प्रयोग त्यांच्यावरच होणार असल्याचे दृश्य या आठवडय़ात पाहायला मिळेल. सरिता आणि तिच्या कुटुंबात कलह कसा होईल यासाठी नेहमीच प्रयत्न करणारी मामी, आपली मुलगी आता त्या घरची सून आहे याचा जराही विचार न करता तिच्या कुटुंबात फूट पाडण्याचे प्रयत्न अखंड करते आहे. हीच कारस्थाने तिच्या लेकीसमोर म्हणजे अंजीसमोर आता उघड होतील त्यामुळे अंजी आपल्या आईला ढवळून टाकणार का हे आगामी भागात कळेल. तर महिला वर्गाच्या विशेष पसंतीस उतरलेल्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत पतीने केलेल्या फसवणुकीनंतर आई काय भूमिका घेणार? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. पण खचून न जाता खंबीर झालेली अरुंधती अनिरुद्धलाच नाही तर संजनालाही जाब विचारायला तिच्यासमोर उभी ठाकणार आहे. त्यामुळे आगामी भागात येणारे आईचे ‘सक्षमीकरण’ प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेईल यात शंका नाही. तर ‘वैजू नंबर वन’ या मालिकेत धनंजय माने हे मराठी सिनेमातले अजरामर पात्र प्रवेशणार आहे. अभिजीत चव्हाण हे पात्र साकारत असून आनंद इंगळे आणि सुहास परांजपे हे पाहुणे कलाकार धुडगूस घालण्यासाठी येणार आहेत.

तरुणांचा वावर असलेली मालिका कायमच पसंतीस उतरत असते. मग ती ‘एका लग्नाची गोष्ट’ असो, ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ असो. ‘झी मराठी’ने अशा प्रेमकथांना कायमच दुजोरा दिला आहे. सध्या सुरू असलेली ‘माझा होशील ना’ ही मालिकाही अशीच गाजते आहे. आदित्य आणि सई यांचा प्रेमप्रवास मैत्रीतून प्रेमाच्या वाटेकडे चालला आहे. मध्ये सईची आई गतिरोधक म्हणून उभी आहे खरी पण हेही दिवस जातील. सईचा राग घालवण्यासाठी आदित्यने तिला रातराणीचे कानातले दिले आहेत. पण सईची आई त्यांना कचऱ्याचा डबा दाखवते. अशातच आदित्यला आपल्या आईवडिलांचा भूतकाळ मामांकडून समजतो. आगामी भागात आदित्यला आपल्या आईवडिलांच्या समृद्ध वारशाचा आणि सईला रातराणीचा शोध लागणार आहे. तर ‘अगं बाई सासूबाई’ या मालिकेत अभिजीत आणि आसावरीच्या नात्यातील तणाव काहीसा दूर होताना दिसेल. अभिजीतची तब्येत बरी नसल्याचे कळताच आसावरी तिथे पोहोचते आणि त्यांची काळजी घेते. त्यानंतर आजोबांची तब्येत बरी नसल्याने ती गावाला जाते. परंतु विक्रीसाठी ठेवलेल्या फराळाची जबाबदारी सोहमवर देऊन जाते. सोहम मात्र त्याची नासधूस करतो. आता हे प्रकरण शुभ्रा कशी निस्तरते हे कळेल.

‘कलर्स मराठी’वरही मालिका उत्कंठावर्धक टप्प्यांवर आहेत. एरव्ही संजीवनीला नजरेच्या धाकावर ठेवणाऱ्या आईसाहेब अचानक चाव्यांचा जुडगा संजीवनीकडे सोपवतात. अर्थात, संजीवनीच्या चांगुलपणामुळेच ही जबाबदारी तिच्याकडे येते. परंतु हे सगळे बदल हरखून टाकणारे आहेत. या मालिकेतील दादासाहेब पात्र पूर्वी अजय पुरकर साकारायचे, परंतु त्यांची एण्ट्री एका नव्या संगीत कार्यक्रमात झाल्याने या मालिकेतून त्यांनी रजा घेतली आहे. आता नवीन दादासाहेब आणि त्यांचा संन्यासी अवतार कथानकाला वेगळे वळण देणार आहे. दादासाहेबांच्या अशा रूपाला वैतागून घर सोडून चाललेल्या राजश्रीला थांबवण्यासाठी संजीवनी चाव्यांचा जुडगा राजश्रीकडे देतात. आता आईसाहेबांचा नुकताच जिंकलेला विश्वास संजीवनी गमावणार का हे मात्र लवकरच ‘राजा रानीची गं जोडी’ या मालिकेत पाहायला मिळेल. तर ‘जीव झाला येडापीसा’ या मालिकेत सोनलवर झालेल्या अन्यायाचा सूड घेण्यासाठी सिद्धी मोहीम आखते आहे. एखाद्या अट्टल राजकारणीसारखी तिची वाटचाल प्रत्येकालाच मालिकेकडे ओढून घेणारी आहे. सरकार आणि आत्याबाई दोघांनाही गंडा घालून पत्रकारांसमोर सत्य बाहेर आणायची सिद्धीची युक्ती कशी यशस्वी होतेय यावरच पुढचे कथानक बेतलेले आहे.

जिजाऊंनी फलटणच्या निंबाळकरांच्या सईबाईंशी शिवबांचा विवाह होणे हे जितके राजकीय तितकेच स्वराज्य स्थापनेच्या दृष्टीने उचललेले महत्त्वाचे पाऊल. या विवाहाला शहाजीराजे बंगळूरुहून पोहोचू शकले नाहीत तेव्हा जिजाऊंनी एकटय़ाने शिवबांच्या लग्नाची जबाबदारी लीलया पेलली. त्या काळात अमीनसारखा बलाढय़ शत्रू समोर असताना एकटय़ा स्त्रीने ही जबाबदारी कशी पार पडली याचे वर्णन करणारा असेल सोनी मराठीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेचा नवा सप्ताह. तर ‘आई माझी काळुबाई’मध्ये पुढील आठवडय़ात माधवराजे विराटच्या सांगण्यावरून आर्याच्या विरोधात कुरघोडय़ा करणार आहेत. आता मिलिंदने बंदी बनवून ठेवलेल्या तिच्या भावाला ती शोधू शकेल का, हे पाहण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

प्रसन्नला शंका येते की सईचे काही तरी सुरू आहे आणि त्याला कळते की सई आणि नचिकेतचे एकमेकांवर प्रेम आहे. प्रसन्न या प्रेमाला विरोध करतो, पण अखेर आजीच्या सांगण्यावरून तो नचिकेतला आठ दिवसांची मुदत देतो आणि सांगतो की जर तुम्ही आठ दिवसांमध्ये सांगितलं नाही तर नवव्या दिवशी मी सांगेन. आता नचिकेतला प्रसन्न आणि अप्पांना प्रभावित करण्यासाठी फक्त आठ दिवस आहेत. आता ते प्रसन्न होतील का हे सांगणारा झी युवावरील ‘अलमोस्ट सुफळ संपूर्ण’ या मालिकेचा पुढचा आठवडा असेल. तर ‘डॉक्टर डॉन’ मालिकेत डॉलीचं प्रेम बहरत असताना दुसरीकडे देवा दोन मोठय़ा विरोधकांचा सामना करत आहे. एकीकडे राधा  तर आता दुसरीकडे आक्का. आक्काने देवाला स्पष्ट सांगितले आहे की डॉलीबाईंना या घरात प्रवेश नाही. आक्का वेगवेगळया पद्धतीने डॉलीला त्रास द्यायला सुरुवात करते. अशात खचून न जाता डॉली खंबीरपणे आक्काला तोंड देते. त्यामुळे प्रेमाने नाती जिंकण्याची दृश्ये या मालिकेतही प्रेक्षकांना पाहायला मिळतील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Article about marathi tv serial on different channels zws