माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी तो कधी ना कधी आपल्या मुळाकडे परत येतो. आपली माती, आपली माणसे, आपला इतिहास त्याला खुणावू लागतो. अज्ञात अशा जगाविषयीची आपलेपणाची जाणीव माणसाला त्याच्या भूतकाळात घेऊन जाते. तिथे हाती लागतात त्या आठवणी, परंपरा आणि त्या काळात जगणाऱ्या प्रत्येकाचे आपापले दृष्टिकोन, त्यातून निर्माण झालेले समज-गैरसमज. भूतकाळाचा हा शोध माणसाला बौद्धिकदृष्टय़ा मागे नेत असला तरी भावनिकदृष्टय़ा अधिक समृद्ध बनवत असतो. प्रसाद कांबळी निर्मित आणि आदित्य इंगळे दिग्दर्शित ‘सोयरे सकळ’ नाटकातूनही हाच समृद्ध अनुभव प्रेक्षकांना मिळतो. मराठी रंगभूमीवरील दर्जेदार आणि वेगळे नाटय़प्रयत्न अधिकाधिक रसिकांपर्यंत पोहोचावेत यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘लोकसत्ता संपादक शिफारस’ या उपक्रमाची मोहोर या नाटकावर उमटली आहे. भद्रकाली प्रॉडक्शनची ५६ वी नाटय़कृती असलेले ‘सोयरे सकळ’ हे नाटक २२ डिसेंबरपासून रंगभूमीवर दाखल झाले आहे. ‘संगीत देवबाभळी’ नाटकाला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता या नाटकालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास निर्माता-दिग्दर्शकांनी व्यक्त केला. कथा, संवाद, संगीत, नेपथ्य, वेशभूषा अशा सर्व बाजूंनी सशक्त नाटय़कृती मंचावर आणण्याची परंपरा भद्रकालीने या नाटकातही कायम राखली आहे. हे नाटक येण्याआधीपासूनच त्याच्या पोस्टरची चर्चा समाजमाध्यमांवर रंगली होती. यात पारंपरिक पेहेरावातील कलाकार दिसत असून ऐश्वर्या आणि अविनाश नारकर ही जोडी बऱ्याच वर्षांनी रंगभूमीवर पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळणार आहे. वेगवेगळ्या काळातील तीन पिढय़ांची नाळ एकमेकांशी कशी जोडलेली असते हे ‘सोयरे सकळ’मधून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कोणत्याही वयोगटातल्या प्रेक्षकाला आपले वाटणारे हे नाटक म्हणजे एक उत्तम कौटुंबिक अनुभव आहे, असा विश्वास नाटकाचे निर्माते प्रसाद कांबळी यांनी व्यक्त केला. ‘लोकसत्ता संपादक शिफारस’ अशी मोहोर उमटलेल्या या नाटकाचे निर्माते प्रसाद कांबळी यांच्यासह दिग्दर्शक आदित्य इंगळे, कलाकार अविनाश नारकर, ऐश्वर्या नारकर, आशुतोष गोखले यांच्याशी साधलेला संवाद.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘माणसाच्या जाणिवांची पोतडी उघडणारे नाटक’

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about soyare sakal drama
First published on: 23-12-2018 at 00:46 IST