एका संगीत नाटकातील मुख्य भूमिकेसाठी त्यांची निवड झाली होती. नाटकाच्या तालमी सुरु झाल्या. पण संगीत नाटक अकादमीची शिष्यवृत्ती मिळाल्याने त्यांनी नाटक सोडण्याचा निर्णय घेतला. तसे घडले नसते तर मराठी संगीत रंगभूमीला एक चांगला अभिनेता-गायक मिळाला असता. लहानपणी गावात भजनाचे कार्यक्रम करणाऱ्या त्यांनाही भविष्यात शास्त्रीय व नाटय़ संगीत हाच आपला श्वास आणि ध्यास होईल असे वाटले नव्हते. पण जिद्द, परिश्रम, रियाज आणि गुरुंचे आशिर्वाद यामुळे ज्यांनी शास्त्रीय व नाटय़संगीतात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले ते ज्येष्ठ गायक पं. प्रभाकर कारेकर आजच्या पुनर्भेटचे मानकरी आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपण अभिनेते होता होता कसे राहून गेलो याविषयी बोलताना पं. कारेकर म्हणाले, शास्त्रीय गायन, नाटय़संगीत आणि मैफलींमुळे नाव झाल्यानंतर मला ही संधी चालून आली होती. विद्याधर गोखले लिखित ‘मदनाची मंजिरी’ या नाटकातील मुख्य भूमिकेसाठी मला विचारणा झाली. मी ही हो म्हटले आणि नाटकाच्या तालमी सुरु झाल्या. पण त्याच वेळी केंद्र शासनाच्या संगीत नाटक अकादमीची शिष्यवृत्ती मला मिळाली. केंद्र शासनाची ती शिष्यवृत्ती मानाची समजली जाते. शिष्यवृत्ती की नाटक यापैकी एकाची निवड मला करायची होती आणि मी शिष्यवृत्ती स्वीकारायचे ठरवले. गोखले अण्णांना तसे सांगितले. सुरुवातीला ते रागावले. मग तुम्हीच सांगा मी काय करू?, असा प्रश्न त्यांना केल्यानंतर मी घेतलेल्या निर्णयाचे त्यांनीही स्वागत केले. त्यानंतर संगीत नाटक आणि अभिनय सुटला तो सुटला. पुन्हा काही त्याकडे वळलो नाही. पुढे शास्त्रीय व नाटय़ संगीत गायन यावरच लक्ष केंद्रित करायचे ठरवले आणि माझ्याकडून उत्तमात्तील उत्तम असे गाणे रसिक श्रोत्यांना देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला, असं ते म्हणतात.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on singer prabhakar karekar classical and theatrical musical singing
First published on: 22-10-2017 at 02:13 IST