हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये चित्रपट गीतांना आणि चित्रपटातील पार्श्वसंगीताला फारच महत्त्व दिले जाते. चित्रपटातील गाण्यांसोबतच इथे गायकांनाही अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. त्यातही असे काही गायक आहेत जे प्रेक्षकांच्या मनावर नेहमीच छाप पाडत असतात. अशाच काही गायकांमधील एक नाव म्हणजे आशा भोसले. हिंदी चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज गायिका आशा भोसले यांनी आजवर विविध चित्रपटांसाठी पार्श्वगायन करत एक काळ गाजवला आहे. आजही आशा भोसले यांच्या आवाजाचे अनेक चाहते आहेत. अशा या दिग्गज गायिका बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीसाठी लवकरच गाणे गाणार आहेत. तत्पूर्वी, आशा भोसले यांनी याआधीही ‘३१ ऑक्टोबर’ या चित्रपटामध्ये गाणे गायले होते. पण, चित्रपटाप्रमाणेच या गाण्याकडेही प्रेक्षकांचे दुर्लक्ष झाले असेच म्हणावे लागेल.

आशा भोसले लवकरच विद्या बालनच्या आगामी ‘बेगम जान’ या चित्रपटात एक गाणे गाणार आहेत. अनु मलिक या गाण्याचे संगीत दिग्दर्शन करणार असून जवळपास दहा वर्षांनंतर आशा भोसले आणि अनु मलिक हे एका गाण्याच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. ‘आशा भोसले यांनी विद्या बालनवर चित्रित एक गाणे गायले आहे. त्यामुळे हे गाणे प्रेक्षकांसाठी परवणीच ठरणार आहे’, असे अनु मलिक एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले.

‘राजकहिनी’ या बंगाली चित्रपटाचा रिमेक असलेल्या ‘बेगम जान’ या चित्रपटात ऐतिहासिक काळ साकारण्यात येणार आहे. श्रिजित मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती महेश आणि मुकेश भट्ट करणार आहेत असेही अनु मलिकने यावेळी स्पष्ट केले. या चित्रपटाच्या अल्बममध्ये सोनू निगम, राहत फतेह अली खान, श्रेया घोषाल या गायकांचे आवाज ऐकण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. १७ मार्च २०१६ला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या चित्रपटामध्ये विद्या बालनसोबतच अभिनेत्री गौहर खानही झळकणार आहे.