एका नाटकाच्या प्रयोगासाठी कलाकार किंवा तंत्रज्ञ जेवढा वेळ देतात, त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त वेळ देतात ते नेपथ्य वाहणारे कर्मचारी. सकाळी लवकर उठून त्यांना नेपथ्य ठेवलेल्या गोदामात जावं लागतं.  तिथे आपल्या टेम्पो किंवा ट्रकमध्ये शिस्तीत सामान घ्यावं लागतं. तिथून प्रयोगाच्या दोन तासांपूर्वी पोहोचायचं. नेपथ्य गाडीतून काढायचं. ते रंगमंचावर व्यवस्थित लावायचं. प्रयोगादरम्यान नेपथ्य काही सेकंदांमध्ये अंधारात बदलायचं. प्रयोग संपला की पुन्हा नेपथ्य उचलून गाडीत ठेवायचं. गोदाम गाठायचं. नेपथ्य उतरवायचं आणि नंतर घरचा रस्ता धरायचा. एका प्रयोगासाठी त्यांना किमान १२ तास त्यांनी खर्ची घालावे लागतात. ट्रेन सुटली की टेम्पोमध्येच रात्र काढावी लागते. सर्वात मेहनतीचं, वेळखाऊ, जिकिरीचं, तणावपूर्ण काम. पण दिवसाच्या शेवटी हातामध्ये मिळतात ते थोडेसेच पैसे. त्यामध्ये दोन वेळचं भागतं. काही दिवसांपूर्वी नोटाबंदीचा निर्णय झाला. नाटकाचे प्रयोग नावापुरतेच झाले. या कर्मचाऱ्यांचं हातावर पोट. प्रयोग नाहीत तर पैसे नाही. आणि त्यानंतर दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडू लागली. गाठीशी जमवलेला पैसा २-३ महिन्यांत संपायला लागला. प्रयोग काही जास्त होतच नव्हते. आता काय करायचं. कुणी मदतीचा हात किंवा अन्य काही कामं देत नव्हतं. महिन्यात ३-४ प्रयोग झाले तर गाठीशी दीड-दोन हजार पडत होते. संसार कसा चालवायचा, हा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर उभा राहू लागला. यावेळी एखादा संकटमोचक अवलिया यावा आणि त्याने काहीसा आधार द्यावा, असं गोष्टींमध्ये घडणारं त्यांच्या आयुष्यात घडलं ते अशोक मुळ्ये या नाटकवेडय़ा वल्लीकडून.

नेहमी पांढऱ्या शर्ट-पँटमध्ये असलेले, त्यामुळेच ‘पांढरा मुळा’ असं नामकरणं झालेले. काटेरी जीभ. स्पष्टवक्ते. पण माणूस फणसासारखा. बाहेरून काटेरी आणि आतून दयाळू. इतरांची दु:ख न पाहवणारा. मुळ्ये काकांना नेपथ्य कर्मचाऱ्यांची ही गोष्ट समजली. इतरांनी हे करावं, ते करावं, यापेक्षा आपण का ते करू नये, अशी भूमिका मुळ्ये काकांची नेहमीच असते. त्यामुळेच त्यांनी एक योजना तयार केली. महिनाभर नेपथ्य कर्मचाऱ्यांची यादी ते करत होते. शिवाजी मंदीरच्या प्रमोद घागरेंनी या कर्मचाऱ्यांची यादी बनवण्यात मदत केली. महिन्याभरात त्यांनी ८६ नेपथ्य कर्मचारी आणि २६ कपडेपट करणाऱ्यांची यादी तयार केली. या ११२ व्यक्तींना त्यांनी तब्बल ८६० किलो तांदूळ आणि ४३० किलो साखर वाटली. यामध्ये नेपथ्य कर्मचाऱ्यांना त्यांनी प्रत्येकी दहा किलो, तर कपडेपट कर्मचाऱ्यांना प्रत्येकी पाच किलो तांदूळ आणि साखरेचे वाटप केलं. तुम्ही म्हणाल, एवढा खर्च मुळ्ये काकांनी स्वत:हून केला का, तर नाही. ‘माझ्या खिशात पैसे नसले तरी पैसेवाली मंडळी खिशात आहेत. माणसं हीच माझी दौलतं,’ असं म्हणत काका स्पष्ट भूमिका मांडतात. या उपक्रमासाठी ‘फॅमिली स्टोर्स’चे अभिजित जोशी आणि गिरगावातील मिलिंद देव यांच्याकडून काकांनी मदत घेतली. समाजोपयोगी उचापती करणारे काका कधीच शांत बसत नाहीत. त्यांच्यामधल्या प्रामाणिकपणामुळे माणसं स्वत:हून मदतीसाठी त्यांच्याकडे येतात. अभिनेत्री निर्मिती सावंत तर कोरा धनादेशच काकांच्या हवाली करते. पण काकांनी या धनादेशावर अजूनपर्यंत सात हजारापेक्षा जास्त रक्कम टाकलेली नाही. अपघातात दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरेला ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी अभिनेता भरत जाधवची भेट त्यांनी घडवून आणली. माझे दोन्ही हात तुझेच आहेत, कधीही काहीही माग, असं मुळ्ये काकाच बोलू शकतात.  उच्च न्यायालयाचे न्यायाधिश सत्यरंजन धर्माधिकारी यांच्यापासून ते अश्विनी जोशी, मेधा मांजरेकर, राहुल लिमये गजानन राऊत, संजय गोविलकर, संजय कांबळे, अशी काकांना मदत करणाऱ्यांची यादी हनुमानाच्या शेपटीएवटी लांबच लांब.

चाळीस वर्षांपासून मी या व्यवसायात आहे. या नेपथ्य वाहणाऱ्या कर्मचाऱ्यांची कष्ट पाहतोय. त्यामुळे त्यांच्यासाठी काही तरी करण्याचे मनात होते. नोटाबंदीच्या काळात त्यांचे झालेले हाल मला पाहवले नाहीत आणि ही कल्पना सुचली. हे दान नाही, सेवा किंवा अनुदान तर नाहीच नाही. ही नव वर्षांची भेट आहे. ती पण एकदाच मी दिली आहे. यापुढे नाही. नाही तर लोकं अजूनही रांगा लावतील. एकदाच यासाठी की या उपक्रमातून प्रेरणा घेऊन अन्य व्यक्तींनी या कर्मचाऱ्यांसाठी काही तरी कार्य करायला हवे. मला कुणालाच दोष द्यायचा नाही, निर्मात्यांना तर नाहीच नाही. कारण सध्या ८० टक्के निर्मात्यांचं चांगलं चाललेलं नाही, असं म्हणत काका आपल्या मताची पिंक टाकून जातात. मुळ्ये काकांचा हा उपक्रम फारच स्तुत्य आणि प्रेरणादायी आहे. याबद्दल बोलालं तेवढंच कमी आहे, असं नेपथ्य कर्मचाऱ्यांचे ठेकेदार प्रकाश परब म्हणत होते.

कलाकार प्रकाशझोतात येतात. पण रंगमंचाच्या मागे काम करणारे हे कर्मचारी नेहमीच अंधारात राहतात. त्यांच्या आयुष्यातही फारसा उजेड पडलेला नसतोच. पगार जेमतेम, कधीकधी त्यांना जेवायलाही वेळ मिळत नाही.  वडापाववर गुजराण करावी लागते. त्यामुळे प्रकृतीच्या समस्याही भेडसावतात. काम करेपर्यंत पगार मिळतो, पण त्यानंतर या रंगभूमीच्या सेवकांचे काय? या प्रश्नांचा विचार प्रत्येक नाटय़प्रेमीने करायला हवा.