गौतम बुद्धाच्या आयुष्यावर आधारित ‘बुध्दा’ या महामालिकेचा शुभारंभ बुध्दपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे २५ मे २०१३ रोजी करण्यात येणार असल्याची घोषणा मालिकेचे निर्माते असलेल्या स्पाईस स्टुडिओ कंपनीकडून करण्यात आली आहे. ‘बुद्धा’ हा दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आणि शेखर कपूर यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.
गौतम बुद्धाच्या आयुष्यावर आधारित भव्य दिव्य चित्रपट काढायच्या हेतूने या दोघांनीही या विषयावरचा संशोधन-अभ्यास सुरू केला होता. मात्र, काही कारणांमुळे हा विषय चित्रपट रू पात येऊ शकला नव्हता. आता झी टीव्हीवर महामालिकेच्या स्वरूपात ‘बुध्दा’ प्रसारित केला जाणार असून त्याचा शुभारंभ खास बुद्धपौर्णिमेचे औचित्य साधून करण्यात येणार आहे.
‘बुद्धा’ या मालिकेशी आशुतोष आणि शेखर कपूर ही दोन मोठी नावे जोडलेली आहेत. या दोघांनी बुद्धाच्या आयुष्यावर भरपूर संशोधन-अभ्यास केला असल्याचे स्पष्ट करण्यात आले असले तरी या मालिकेचे दिग्दर्शन कोण करणार? आशुतोष की शेखर करणार याबाबत अजून काहीही सांगण्यात आलेले नाही. एवढेच नव्हे तर मालिकेत बुद्धाची भूमिका कोण करणार आहे? कलाकारांची निवड पूर्ण होऊन चित्रिकरण सुरू झाले आहे का, अशा कितीतरी गोष्टींबाबत निर्मात्यांनी मौन बाळगले आहे. या मालिकेसाठी गोरेगावातील फिल्मसिटीत भव्य सेट उभारण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याच सेटवर मालिकेचा शुभारंभ करण्यात येणार असून त्यानिमित्ताने आम्रपाली नृत्य आणि बुद्धाची कथा सांगणारे नाटकही दाखवण्यात येणार आहे.
छोटय़ा पडद्याचा विस्तार हा चित्रपटांपेक्षा खूप मोठा आहे. घराघरात हे माध्यम पोहोचले असल्याने ‘बुद्धा’ ची क था मोठय़ा प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचेल. झी टीव्ही या वाहिनीमुळेही मोठय़ा प्रमाणावर ही मालिका देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल, असा विश्वास मालिकेचे निर्माते डॉ. भूपेंद्रकुमार मोदी आणि झीटीव्हीचे सुभाषचंद्र गोयल यांनी व्यक्त केला आहे. याआधी संजय लीला भन्साळी हे बॉलिवूडमधले सर्वपरिचित नाव ‘सरस्वती चंद्र’ या मालिकेची निर्मिती करून छोटय़ा पडद्यावर उतरले आहे. ‘स्टार प्लस’वर भन्साळी प्रॉडक्शनची मालिका आल्याने त्यांना शह देण्यासाठी झी टीव्हीने ‘बुद्धा’ या महामालिके चा घाट घातला असण्याची शक्यता आहे. पण, या मालिकेचे दिग्दर्शन आशुतोष गोवारीकर आणि शेखर कपूर करणार असतील तर छोटा पडदा आणखीनच वजनदार होईल.