माव्‍‌र्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा Avengers: Endgame हा २०१९ मधील सर्वात मोठा चित्रपट प्रदर्शित होण्यास केवळ एक दिवस उरला आहे. भारतात या बहुचर्चित चित्रपटाची अॅडव्हान्स तिकीट बुकींग सुरू झाली असून प्रत्येक १८ व्या सेकंदाला एका तिकीटाची बुकींग सुरू आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर तिकीट बुकींग सुरू असल्यामुळे लवकरच तिकीटांचा तुटवडा निर्माण होणार असल्याचे चित्र तयार झाले आहे. परंतु इंडियन एक्स्प्रेसनने दिलेल्या वृत्तानुसार ‘अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम’ हा चित्रपट लीक झाल्याचे समोर आले आहे.

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असलेला ‘अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम’ हा चित्रपट तमिळरॉकर्स या वेबसाईटवरुन लीक झाला आहे. भारतात तमिळरॉकर्स ही वेबसाईट पायरसीसाठी कुप्रसिद्ध आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपट निर्मात्यांनी चित्रपट लीक करु नका अशी विनंती केली होती. परंतु त्याचा फारसा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले नाही. तसेच चित्रपटातील अनेक भागही लीक झाल्याचे याआधी पाहायला मिळाले होते.

तमिळरॉकर्स या वेबसाईटमुळे ‘अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम’ चित्रपट प्रदर्शनाच्या आधी अनेक प्रेक्षकांपर्यंत पोहोचला आहे. परंतु चित्रपटाची अॅडव्हान्स तिकीट बुकींग मोठ्या प्रमाणावर झाली असल्याने त्याचा चित्रपटाच्या कमाईवर परिणावर होणार नसल्याचे दिसत आहे.

गेल्या वर्षी मद्रास हायकोर्टानं ३७ इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपनीला १२ हजार वेबसाईट ब्लॉक करण्याचे आदेश दिले होते. यात ‘तमिळरॉकर्स’ वेबसाइटच्या २ हजार मायक्रोसाइट्चादेखील समावेश होता. तामिळरॉकर्स वेबसाईट ब्लॉक केल्यानंतर तिच्याच हजारो मायक्रोसाइट्स सक्रिय झाल्या आणि यातून चित्रपट लीक व्हायला सुरूवात झाली.

सुपरहिरोपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘माव्‍‌र्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’ने भारतीय प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली आहे. गेल्या १० वर्षांत त्यांनी प्रदर्शित केलेल्या जवळपास प्रत्येक सुपरहिरोपटाला भारतीय प्रेक्षकांनी मनापासून दाद दिली.