‘अ‍ॅव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर’ने तिकीटबारीवर घसघशीत कमाई केली. आता चाहते या सुपरहिरोपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहात आहेत. ‘सायन्स फिक्शन’ प्रकारात मोडणाऱ्या या सुपरहिरोपटात वैज्ञानिक संकल्पनांना कल्पनेची जोड देऊन काहीतरी भव्य-दिव्य निर्माण करण्याचा केला गेलेला एक यशस्वी प्रयत्न दिसला. मात्र जिथे विज्ञान येते तिथे अनेक प्रकारचे तर्क-वितर्क लावले जातात. आजवर प्रदर्शित झालेल्या ‘इन्सेप्शन’, ‘अवतार’, ‘द टर्मिनेटर’, ‘द मेट्रिक्स’ यांसारख्या इतर शेकडो सायफायपटांप्रमाणेच ‘इन्फिनिटी वॉर’ही त्यास अपवाद नाही. एकीकडे चाहत्यांनी चित्रपटावर स्तुतीसुमने उधळली तर दुसरीकडे विज्ञानाच्या जाणकरांनी मात्र त्यातील वैज्ञानिक संकल्पनांवर प्रश्न उपस्थित केले. चित्रपटाचा शेवट अनेकांसाठी चर्चेचा व गोंधळाचा विषय ठरला. शेवटी खलनायक ‘थेनॉस’ एक टिचकी वाजवून अर्ध्या  विश्वाचा सर्वनाश करतो. यात आपले काही लाडके सुपरहिरोदेखील मारले जातात.

परंतु वैज्ञानिकदृष्टय़ा विचार करणाऱ्या प्रेक्षकांना मात्र हा हृदयद्रावक शेवट पटलेला नाही. कारण सामान्य विज्ञानाच्या अनुषंगाने विचार करता धातूचा हातमोजा घालून टिचकी वाजवणे शक्यच नाही. आता टिचकी नेमकी वाजते कशी? तर दोन बोटांमध्ये घर्षण होते. त्यातून हवेचा दाब निर्माण होतो. दरम्यान टिचकी वाजवण्याची क्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन बोटांच्या घर्षणादरम्यान दाबली गेलेली हवा एकदम बाहेर पडते आणि त्यातून आवाजाची निर्मिती होते. चित्रपटाच्या पटकथेनुसार थेनॉसने टिचकी वाजवणे हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. कारण त्यावरच चित्रपटाचा दुसरा भाग अवलंबून आहे. परंतु टिचकी वाजण्यामागच्या सामान्य विज्ञानाचा विचार केला तर मात्र चित्रपटाची पटकथा फोल ठरते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘इन्फिनिटी वॉर’च्या दुसऱ्या भागाच्या निमित्ताने नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेतही वृत्तमाध्यमांव्दारे ‘थेनॉस’च्या टिचकीवर प्रश्न उपस्थित केले गेले. परंतु सतत वैज्ञानिक संकल्पनांचे दाखले देणाऱ्या ख्रिस्तोफर मार्क्‍स व स्टीफन मॅक्फली यांनी या संदर्भात एक वेगळाच धक्कादायक खुलासा केला. त्यांच्या मते जेव्हा त्यांनी या चित्रपटाची पटकथा लिहली तेव्हा शेवट काहीतरी वेगळाच होता. कारण त्यांना दोन भागांमध्ये तीन वर्षांचे अंतर ठेवायचे होते. दरम्यान, ‘अँटमॅन अ‍ॅण्ड द वास्प’ आणि ‘कॅप्टन माव्‍‌र्हल’ या चित्रपटांचा वापर ‘इन्फिनिटी वॉर’च्या दुसऱ्या भागाची पाश्र्वभूमी तयार करण्यासाठी  केला जाणार होता. मात्र निर्माते केव्हिन फेग यांच्या आग्रहाखातर शेवटी जबरदस्तीने टिचकी वाजवण्याचा कार्यक्रम केला गेला. दोन्ही लेखकांनी आपल्या बोलबच्चनगिरीतून अनेकांना अवाक केले. आणि  शेवटी जणू ‘एक टिचकी की कीमत तुम क्या जानो..’ म्हणत थेनॉसच्या टिचकी मागील रहस्यावर त्यांनी सफाईदारपणे पडदा टाकला.