गेल्या वर्षभरात बॉलिवूड चित्रपटांमध्ये, कलाकारांमध्ये एक वेगळा ट्रेण्ड पाहायला मिळाला. हा ट्रेण्ड म्हणजे चित्रपटांचा अनोखा विषय आणि चौकटीबाहेरच्या भूमिका साकारणारे ठराविक अभिनेते. यात प्रामुख्याने विकी कौशल, राजकुमार राव, आयुषमान खुराना यांची नावं येतात. या कलाकारांच्या चित्रपटांना केवळ व्यावसायिक यश नाही मिळालं तर त्यांच्या दमदार अभिनय कौशल्याची भरभरून प्रशंसाही झाली. त्यातही कोणताही ‘गॉडफादर’ नसताना बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करून यश गाठणं काही सोपं काम नाही. पण हे शक्य करून दाखवलंय आयुषमान खुराना आणि विकी कौशल यांनी. ६६व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची नुकतीच घोषणा झाली असून सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार या दोघांनी पटकावला आहे. विशेष म्हणजे पुरस्कारांच्या संपूर्ण यादीत ‘खान’दानचं नाव कुठेच दिसत नाही. सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान यांच्यापुढे आता या नव्या दमाच्या कलाकारांचं आव्हान आहे.
आयुषमान खुरानाच्या ‘अंधाधून’ व ‘बधाई हो’ या दोन्ही चित्रपटांनी राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये बाजी मारली आहे. तर विकी कौशलला ‘उरी’ या चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला. ‘विकी डोनर’पासून ‘बधाई हो’पर्यंत आयुषमानने नेहमीच चौकटीबाहेरच्या विषयांना व भूमिका प्राधान्य दिलं आहे. तर ‘मसान’, ‘राजी’ आणि ‘उरी’ या चित्रपटांमध्ये विकीने त्याच्या दमदार अभिनयाचं प्रदर्शन केलं आहे. एकूणच बॉलिवूडमध्ये सध्या यूथ ब्रिगेडचा बोलबाला आहे असं म्हणायला हरकत नाही.
दुसरीकडे ‘खान’दानचा विचार केल्यास ‘ट्यूबलाइट’, ‘रेस 3’ हे सलमानचे चित्रपट बॉक्स ऑफीसवर दणक्यात आपटले. आमिर खानच्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ला तर २०१८ या वर्षातल्या सर्वांत फ्लॉप चित्रपटाचा किताब मिळाला असं म्हणावं लागेल. शाहरुखच्या ‘जब हॅरी मेट सेजल’, ‘झिरो’ या चित्रपटांनाही बॉक्स ऑफीसवर यश मिळालं नाही. त्यामुळे सध्या तरी ‘खान’दानवर संकट असल्याचं चित्र दिसत आहे.