‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली २’ या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या प्रत्येक कलाकाराने आपली वेगळी छाप सोडली आहे. याच कलाकारांमधील एक नाव म्हणजे अभिनेत्री रम्या कृष्णन. बाहुबलीच्या घरंदाज ‘राजमाता शिवगामी देवी’च्या भूमिकेत झळकलेल्या रम्याच्या भूमिकेला बरीच लोकप्रियता मिळाली होती. तिचा वेगळा अंदाज, आग ओकणारे डोळे आणि ‘मेरा वचन ही है शासन’ असं म्हणताना आवाजात असणारा दरारा याविषयी काय आणि किती बोलावं हाच मोठा प्रश्न. अशी ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात बरीच मॉडर्न असून तिचा मॉडर्न लूक नुकताच पाहायला मिळाला.
‘जस्ट फॉर वुमन’ या मासिकाच्या कव्हर पेजसाठी रम्याने हे फोटोशूट केलं असून यामध्ये ती मॉडर्न लूकमध्ये दिसत आहे. काही क्षणांसाठी तर, चित्रपटामध्ये राजकारण आणि सत्ता या विषयांवर गंभीर विचार करणारी आणि मुलाचं हित पाहणारी राजमाता हीच होती का, असा प्रश्नही मनात घर करुन जातो. कारण, रम्याचा हा ‘कव्हर गर्ल’ लूक अनेकांचं लक्ष वेधत आहे. यामध्ये कोणत्याही भडक रंगांचा आणि भडक मेकअपचा वापर न करता तिचा लूक साकारण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. या नव्या लूकमधील एक फोटो ‘रम्या एफसी’ या फॅनपेजच्या इन्स्टाग्राम अकाऊंद्वारे पोस्ट करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर हा फोटो पोस्ट करताच अनेकांनी तो लाइक आणि शेअरही केला आहे. मुख्य म्हणजे तिचा हा लूक पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे चाहत्यांच्या या प्रतिक्रिया पाहून रम्याला सुद्धा आनंद झाला असणार यात शंकाच नाही.
वाचा : कमल हसनच्या ‘अप्पूराजा’तील ‘अप्पू’ साकारण्यासाठी करण्यात आल्या होत्या या करामती
https://www.instagram.com/p/BXdiZaID2r3/
https://www.instagram.com/p/BWuNct9jLLJ/
दरम्यान, ‘बाहुबली’ या चित्रपटामुळे चर्चेत आलेल्या रम्याने आतापर्यंत तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषिक चित्रपटात काम केलं आहे. बॉलिवूडमध्येही तिने १९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दयावान’ या चित्रपटातही काम केलं होतं. या चित्रपटात तिने एक डान्सरचा कॅमिओ केला होता. १९९३ मध्ये आलेल्या संजय दत्तच्या ‘खलनायक’मध्येही ती दिसली होती. पण, ‘चाहत’ आणि ‘बडे मियां छोटे मियां’ या चित्रपटांनी ती विशेष करून ओळखली गेली होती.