तब्बल ३५० कोटी रुपये बजेट असलेला प्रभासचा बहुचर्चित ‘साहो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला पण प्रेक्षकांच्या अपेक्षांवर तो अपयशी ठरला. सोशल मीडियावर ‘साहो’साठी नकारात्मक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत आणि याचा परिणाम त्याच्या बॉक्स ऑफीसवर कमाईवरही होऊ लागला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजीत सिंगने केले. ‘साहो’ प्रदर्शित होण्यापूर्वी प्रभासने हा चित्रपट ‘बाहुबली’चे दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांना दाखवला होता. त्यावेळी राजामौली यांनी ‘साहो’बद्दल काही मतं मांडली होती पण निर्माते-दिग्दर्शकांनी ती विचारात घेतलीच नाही असं कळतंय.
‘न्यूज १८’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, राजामौलींनी ‘साहो’च्या कथेच्या लांबीवर प्रश्न उपस्थित केला होता. ”कथा उगाचच ताणल्यासारखी वाटत आहे. बऱ्याच नको असलेल्या गोष्टी यातून वगळता येतील,” असा सल्ला त्यांनी प्रभासला दिला होता. मात्र प्रभासने हा सल्ला मनावर घेतला नाही. अनेक चित्रपट समीक्षकांनी चित्रपटाच्या लांबीवर नकारात्मक टिप्पणी केली होती.
सिनेमा पाहण्याआधी हा व्हिडीओ नक्की पाहा!
प्रभासची मुख्य भूमिका असलेला ‘बाहुबली- द बिगनिंग’ व ‘बाहुबली- द कन्क्लुजन’ हे राजामौलींचे दोन्ही चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले होते. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत राजामौली हे नावाजलेले दिग्दर्शक आहेत. त्यामुळे त्यांचा सल्ला मनावर न घेणं ‘साहो’च्या टीमला चांगलंच महागात पडल्याचं दिसत आहे.