रणवीर सिंग आणि वाणी कपूरच्या बहुचर्चित ‘बेफिक्रे’ सिनेमाचे पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. आतापर्यंत सिनेमाच्या प्रत्येक पोस्टर्समध्ये रणवीर आणि वाणी च्युंबनदृश्य देताना दिसले आहेत. या गाण्याबरोबर अजून एक पोस्टरही प्रदर्शित झाले आहे. आधीच्या पोस्टरप्रमाणेच या पोस्टरमध्येही दोघे च्युंबनदृश्य देत आहेत.  या पोस्टर्समध्ये फ्रान्ससारख्या सुरेख देशातील आकर्षक ठिकाणांची पार्श्वभूमी दिसत आहे. अभिनेता रणवीर सिंग त्याच्या वागण्या-बोलण्याने आणि त्याच्या अभिनयाने नेहमीच चर्चेत असतो. ‘राम-लीला’, ‘बाजीराव मस्तानी’ यांसारख्या चित्रपटांतून अफलातून अभिनय सादर करत रणवीर सिंग निर्विवादपणे चाहत्यांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. तर ‘शुद्ध देसी रोमान्स’ चित्रपटातून प्रसिद्ध झालेली वाणी ‘बेफिक्रे’मध्ये रणवीरसह झळकणार आहे.

‘लबों का कारोबार’ या नावाने हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यातून प्रत्येक प्रेम कथेची सुरुवातही चुंबनामुळे होते असे सांगण्यात आले आहे. या गाण्यात तरुणांबरोबरच वयोवृद्ध आणि लहान मुलांही चुंबन करताना दाखवली आहेत.
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग याने त्याचा आगामी सिनेमा ‘बेफिक्रे’साठी त्याने फार मेहनत घेतली आहे. रणवीरने त्याचा खासगी ट्रेनर लॉयड स्टीवन्ससोबत पॅरिसमध्येही जीममध्ये घाम गाळला. स्टीवन्सने रणवीरच्या नवीन लुकचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला. व्यायाम करतानाचा त्याचा आणि रणवीरचा एक फोटो ट्विटरवर शेअर करत तो म्हणाला की, यातून हे स्पष्ट होत आहे की बेफिक्रेसाठी रणवीरने कोणते प्रमुख बदल केले आहेत.
या सिनेमात रणवीर वाणी कपूरसोबत दिसणार आहे. आदित्य चोप्रा या सिनेमाद्वारे सात वर्षांनंतर परत एकदा दिग्दर्शन करत आहे. आदित्यने सात वर्षांपूर्वी ‘रब ने बना दी जोडी’ हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. ‘यशराज फिल्म्स’ या बॅनर अंतर्गत बनणाऱ्या या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता रणवीर सिंग प्रथमच निर्माते-दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांच्यासोबत काम करणार आहे.