बंगली टीव्ही अभिनेत्री बृष्टी रॉय (Brishti Roy)चे गेल्या काही दिवसांपासून जगणे कठीण झाले आहे. बृष्टीला सतत कुणाचे ना कुणाचे तरी फोन येत आहेत आणि तु एस्कॉर्ट सर्व्हिस देते का? तुझे दर काय आहेत? असे अनेक प्रश्न तिला विचारण्यात आले आहेत. मात्र हे फोन का येत आहेत हे बृष्टीला जेव्हा कळाले तेव्हा तिच्या पायाखालची जमिनच सरकली. बृष्टीचा एस्कॉर्ट सर्व्हिस पोस्टवर फोटो छापण्यात आला होता.

बृष्टीचे हे पोस्टर कोलकाताच्या लोकल ट्रेन आणि रेल्वे स्थानकांवर लावण्यात आले होते. या पोस्टरवर बृष्टीचा फोटो, नाव आणि फोन नंबर देण्यात आला होता. या संबधात बृष्टीने आयएएनएसशी संवाद साधला. ‘मला २४ ऑगस्ट पासून अनोळखी नंबरवरुन फोन येत आहेत. सुरुवातीला मला हे स्पॅम कॉल असल्याचे वाटले. मात्र तीन दिवसानंतर मला माझ्या मित्राने लोकल ट्रेनमधील पोस्टरबाबत सांगितले. हे पोस्टर एस्कॉर्ट सर्व्हिसचे होते. या पोस्टरवर माझे नाव, फोटो आणि फोन नंबर देण्यात आला होता. त्याने मला या पोस्टरचा फोटो पाठवला. ते ऐकून मला धक्काच बसला. मला त्यानंतरही सतत फोन येत होते आणि मला सर्व्हिसचे रेट विचारले जात होते. त्यांना माझा नंबर त्या पोस्टद्वारे मिळाला हे देखील त्यांनी सांगितले’ असे बृष्टी म्हणाली.

छोट्या पडद्यावर काम करणारी बृष्टी सोनारपुर मधील मालंचा येथे राहते. ती बंगाली मालिकांमध्ये काम करते. या सर्व फोन कॉलला कंटाळून बृ्टीने नंबर बदलण्याचा निर्णय घेतला होता. ‘मी कंटाळून नंबर बदलण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता ते ही करता येणार नाही. कारण पोलिसांची या बाबत चौकशी सुरु आहे. त्यांना या प्रकरणाचा तपास घेण्यासाठी माझा नंबर हवा आहे. माझे संपूर्ण काम याच नंबरने सुरु असल्याने मी एका रात्रीमधून नंबर बदलू शकत नाही. माझा विश्वास आहे पोलिस दोषीला लवकरात लवकर पकडतील’ असे पुढे बृष्टी म्हणाली आहे.

बृष्टीने सोनारपुर पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली असून पोलिया घटनेची दखल घेत आहेत. ‘पोस्टरवर नंबर आणि फोटो कोणी छापला याची चौकशी सुरू आहे. पण अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही’ असे पोलिस अधिक्षक राशिद खान यांनी सांगितले