टेलिव्हिजन विश्वात एका अनोख्या अंदाजाने प्रेक्षकांची मनं जिंकण्यात अभिनेत्री शुभांगी अत्रे चांगलीच यशस्वी झाली आहे. ‘लड्डू के भैय्या…’ असं म्हणणारी ही शुभांगी अत्रे म्हणजे सर्वांचीच लाडकी अंगुरी भाभी. ‘भाभी जी घर पर हैं’ या मालिकेमध्ये ‘अंगुरी भाभी’ ही व्यक्तिरेखा साकारणारी शुभांगी अनेकांचीच दाद मिळवत आहे. तिची हिच लोकप्रियता लक्षात घेत आणि मालिकेतील तिचा एकंदर लूक आणि बोलण्या-चालण्याचा अंदाज घेत सध्या राजकीय क्षेत्रातही तिच्या नावाची चर्चा आहे. लाइव्ह हिंदुस्तानने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार उत्तर प्रदेशातील काही राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी शुंभागीकडे विचारणा केली आहे.
‘माझा कार्यक्रम लखनऊ आणि कानपूर या भागांवर आधारित असल्यामुळे काही राजकीय पक्षांची अशी धारणा आहे की, मी त्या भागातील मतदारांना प्रभावित करु शकेन’, असे शुभांगी म्हणाली. आपल्यासमोर येणाऱ्या या प्रस्तावांविषयी सांगताना शुभांगीने स्पष्ट केले की, ‘योग्य त्या ऑफरचा पूर्णपणे विचार करुनच मी त्यासंबंधीचा पुढचा निर्णय घेईन’. कोणा एका पक्षाचा प्रचार करण्यापेक्षा मी मतदारांना मत देण्यासाठी प्रोत्साहित करु इच्छिते असे शुभांगी म्हणाली.
दरम्यान, सध्या देशातील विविध राज्यांमध्ये निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. मतदारांची मनं जिंकण्यासाठी बरेच राजकीय पक्ष सध्या विविध मार्गांचा अवलंब करत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे सेलिब्रिटींच्या मदतीने केला जाणारा प्रचार. विविध सेलिब्रिटींची लोकप्रियता पाहता त्यांच्या या लोकप्रियतेचा वापर करत राजकीय नेते त्यांची पोळी भाजू पाहात आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही.