कॉमेडियन भारती सिंग ३ डिसेंबरला हर्ष लिम्बाचियासोबत लग्न बंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वी भारतीचा बांगड्या भरण्याचा कार्यक्रम पार पडला. बुधवारी भारती आणि हर्ष यांनी मिळून ‘माता की चौकी’ सजवली होती. यावेळी टीव्ही जगतातील अनेक कलाकारांनी या कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थिती लावली होती.
भारती लग्नात प्रसिद्ध फॅशन डिझायनर नीता लुल्लाने डिझाइन केलेला ड्रेस घालणार आहे. नीता लुल्लाने भारतीच्या लग्नासाठी नारंगी रंगाचा अनारकली पॅटर्नमध्ये ड्रेस डिझाइन केला आहे. नीताने याआधी ऐश्वर्या- अभिषेक बच्चन, ईशा देओल- भारत तख्तानी, ईशा कोपीकर- टिमी नारंग, रितेश देशमुख- जेनेलिया डिसूझा यांच्या लग्नाचेही ड्रेस डिझाइन केले आहेत.
‘भारतीच्या ड्रेससाठी मी फ्युजन थीमची निवड केली आहे. लग्नासाठी नारंगी रंगाचा नेटचा अनारकली ड्रेस डिझाइन केला आहे, ज्यावर अत्यंत बारीक एम्ब्रॉयडरी असेल. तर रिसेप्शनसाठी निळ्या रंगाचा डायमंड एम्ब्रॉयडरी असलेला गाऊन डिझाइन केल्याचे नीताने सांगितलं होतं. बिग बॉसची माजी स्पर्धक मोनालिसा आणि तिचा पती विक्रांत सिंह, टीव्हीवरील प्रसिद्ध जोडी रित्विक धनजानी आणि आशा नेगीही उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी या दोघांनी प्री- वेडिंग फोटोशूट केले होते. या फोटोशूटमध्ये दोघांच्या लग्नाची तारीखही कळली. प्री- वेडिंग फोटोशूटनंतर भारतीचे ब्रायडल शॉवर झाले. या कार्यक्रमाला तिच्या जवळचा मित्र- परिवार उपस्थित होता. तिच्या ब्रायडल शॉवरचे फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाले होते. ब्रायडर- शॉवरसाठी भारतीने निळ्या रंगाचा गाऊन घातला होता.
स्वतः भारती सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. ती हर्ष आणि तिच्या लग्नाच्या अनेक घडामोडी वेळोवेळी आपल्या चाहत्यांना सांगत असते. तिने इन्स्टाग्रामवरुनच तिच्या आणि हर्षच्या नात्याबद्दल खुलासा केला होता. भारतीने एका व्हिडिओच्या माध्यमातून हर्षने तिला मागणी घातल्याचे सांगितले होते. आम्ही दोघं एकमेकांना फार काळापासून ओळखतो. आमच्यात खूप चांगली मैत्री आहे त्यामुळेच आमचे नाते अजूनही फ्रेश आहे. ३ डिसेंबरला भारती आणि यश विवाहबंधनात अडकणार असून ते गोव्याला डेस्टिनेशन वेडिंग करणार आहेत.