इम्रान हाश्मी कायम भट्ट कॅम्पचा हिरो राहणार नाही हे लक्षात आल्यानंतर दिग्दर्शक आणि निर्माता महेश भट्ट यांनी अनेक नवीन कलाकारांना संधी देत त्यांना ‘आपलेसे’ करण्याचा प्रयत्न केला. यात प्रामुख्याने रणदीप हुडा आणि कुणाल खेमू यांची नावे घेता येतील. मात्र, या दोघांनाही भट्ट कॅम्पचा ‘चेहरा’ बनवण्यात त्यांना यश आले नाही. सध्या महेश भट्ट आगामी ‘खामोशियाँ’ चित्रपटावर बरीच मेहनत घेऊन काम करत आहेत. त्यांना यात साथ मिळाली आहे ती पहिल्यांदाच त्यांच्या चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेता अली फजलची. ‘थ्री इडियट्स’, ‘फुकरे’सारख्या चित्रपटातून नावारूपाला आलेल्या अलीशी दिग्दर्शक महेश भट्ट यांची गट्टी जमली असून त्यांनी अलीबरोबर नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.
‘खामोशियाँ’ हा चित्रपट करण्यामागे महेश भट्ट हे एक महत्त्वाचे कारण होते. त्यांच्या हाताखाली कुठलीही भूमिका मिळाली तर त्याचे सोनेच होईल, अशी माझी खात्री होती. म्हणूनच, आजवर या पठडीतला चित्रपट केलेला नसतानाही मी ‘खामोशियाँ’तील लेखकाची भूमिका स्वीकारली, असे अली फजल याने सांगितले. या चित्रपटाच्या निमित्ताने महेश भट्ट यांच्याबरोबर आपले चांगले संबंध जुळले असल्याचे अली म्हणाला. ‘खामोशियाँ’ हा थरारपट आहे असे सांगितले जात असले तरी ती एक प्रेमकथा आहे. पण, या प्रेमकथेची मांडणी आजवरच्या चित्रपटांपेक्षा वेगळी असल्याने तो थरारपट असल्याचा भास होतो, अलीचे म्हणणे आहे. हा चित्रपट वेगळा असल्यामुळे एक कलाकार म्हणून अभिनयाव्यतिरिक्त इतर गोष्टींमध्येही तितकाच रस घेतला होता आणि म्हणूनच महेश भट्ट यांच्याशी जास्त संवाद साधण्याची संधी आपल्याला मिळाल्याचे त्याने सांगितले. महेश भट्ट यांनी अलीला आपल्या आगामी चित्रपटाचा नायक म्हणून करारबद्ध केले आहे.
‘खामोशियाँ’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अलीचा पहिलावहिला हॉलीवूडपट ‘फास्ट अँड फ्युरिअस ७’ प्रदर्शनासाठी सज्ज असेल. त्या चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे ‘फास्ट अँड फ्युरिअस ७’ प्रदर्शित झाल्यानंतर मग जूनमध्ये पूजा भट्ट दिग्दर्शित चित्रपटाचे काम सुरू होईल, अशी माहिती अलीने दिली. या चित्रपटात रिचा चढ्ढा अलीबरोबर मुख्य भूमिकेत आहे. त्यानंतर मग तो महेश भट्ट यांच्या चित्रपटावर काम करणार आहे. भट्ट कॅम्पचा ‘चेहरा’ म्हणून त्यात अडकायचे नसले तरी त्यांचे चित्रपट हे सर्वार्थाने वेगळे आणि लोकप्रिय असतात. त्यामुळे ‘खामोशियाँ’ ही भट्ट कॅ म्पमधली आपली सुरुवातच महत्त्वाची वाटत असल्याचे अलीने सांगितले.
रेश्मा राईकवार, मुंबई

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhatt camp new hero ali fazal
First published on: 23-01-2015 at 01:48 IST