लॉकडाउनमध्ये लोकांना ‘रामायण’ व ‘महाभारत’ या गाजलेल्या पौराणिक मालिका पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. या दोन्ही मालिका व त्यातील कलाकारांचे सोशल नेटवर्किंगवर कौतुक होताना दिसत आहे. बी. आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ मालिकेत भीष्म पितामह यांची भूमिका साकारणारे अभिनेते मुकेश खन्ना यांनी काही दिवसांपूर्वीच ही मालिका पुन्हा सुरू झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला होता. मात्र आता मुकेश खन्ना यांची ही भूमिका पुन्हा चर्चेत आली आहे. त्याला कारण म्हणजे ‘महाभारत’ मालिकेच्या एका भागामध्ये मुकेश खन्ना यांच्यामागे चक्क कुलर दिसत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी आता महाभारत काळापासून आपल्याकडे कुलर वगैरे होते का असा मजेदार सवाल उपस्थित केला आहे.
देशामधील कोरनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३ मे पर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आलेली आहे. मात्र या कालावधीमध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी केंद्र सरकारने दूरदर्शन या सरकारी वाहिनीवर नव्वदच्या दशकातील अनेक मालिकांचे पुन्हा प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला आहेत. यामध्ये ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या महाकाव्यांवर आधारित मालिकाही पुन्हा दाखवल्या जात आहे. टीव्हीचा छोटा पडदा गाजवणाऱ्या या मालिका प्रेक्षक आवडीने पाहत असून त्याचा परिणाम टीआरपीमध्येही दिसून येत आहे. असं सगळं असतानाच अनेकजण या मालिकांच्या जुन्या आठवणी, मालिकांमध्ये दिसणाऱ्या गोष्टी याबद्दल सोशल नेटवर्किंगवर चर्चा करत आहेत. अशीच एक चर्चा आता रंगली आहे ती भीष्म पितामह यांच्या कुलरची. या कुलरचे दर्शन घडवणारे अनेक स्क्रीनशॉर्ट सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होताना दिसत आहेत.
दुर्योधनाने पुन्हा सारीपाट खेळण्याचा अट्टास केलेल्या मालिकेच्या भागामध्ये भीष्म पितामह यांच्या मागील बाजूस कुलर दिसल्याचा दावा नेटकऱ्यांनी केला आहे. युट्यूबवरही या भागाचा व्हिडिओ उपलब्ध आहेत. मालिकेच्या ४९ व्या भाग असणाऱ्या या व्हिडिओमधील ३२ मिनिटं ४७ सेंकदाला भीष्प पितामह यांच्या मागे कुलर दिसतो. तुम्हीच पाहा हा व्हिडिओ…
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांना ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या प्रसिद्ध मालिकेमधील एका भागामध्ये दिसलेला स्टारबक्सचा कप आठवला आहे.
अनेकांनी यासंदर्भात वेगवगेळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यातील ही एक प्रतिक्रिया पाहा ज्यामध्ये त्या काळातही आपण एवढे पुढारलेले होतो का असा सवाल उपस्थित केला आहे.
Bhishma pitamaha Cooler ki hawa lete hue
Us samay bhi humare paas cooler hua krte the. #Ramayan#Mahabharat #IndiaFightsCorona #coronavirusinindia #CoronavirusPandemic #महाभारत pic.twitter.com/IEF5TmeYul #ramayan
— ℓαχмαи(@laxman_angry) April 21, 2020
आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी अशाच पद्धतीचे आणखीन व्हिडिओ सापडतात का याबद्दल नक्कीच शोध घेत असल्याचीही चर्चा सोशल नेटवर्किंगवर रंगली आहे.