बिग बॉस मराठीमधील राजेश श्रुंगारपूरे आणि रेशम टिपणीसमधील संबंधांवर रेशमचा प्रियकर संदेश किर्तीकरने अखेर मौन सोडले आहे. रेशम आणि राजेशला जवळ येताना बघून मला वाईट वाटायचे, असे त्याने म्हटले आहे.

बिग बॉस मराठीच्या एका भागात रेशमने प्रियकर संदेशची आठवण येत असल्याचे म्हटले होते. यानंतर ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने संदेश किर्तीकरची मुलाखत घेतली असून या मुलाखतीत त्याने रेशम- राजेशमधील नात्याविषयी भाष्य केले. ‘रेशम आणि राजेश या दोघांना जवळ येताना बघून मला वाईट वाटायचे. पण यानंतर मनोरंजन क्षेत्रातील काही मित्रमंडळींनी माझ्या मनातील शंका दूर केल्या. हा फक्त खेळ असल्याचे माझ्या लक्षात आले. रेशमला शोमध्ये असे करण्यास सांगण्यात आले होते का?, याबाबत मला काहीच माहित नाही, असे त्याने सांगितले.

मी आणि रेशम तीन वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. अडीच वर्षांपासून आम्ही डेट करतोय. आम्ही लग्नाबाबत सध्या कोणताही विचार केलेला नाही, असे त्याने सांगितले. रेशमने कार्यक्रमात जाहीरपणे तुझ्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या. मग तू रेशमला भेटायला बिग बॉसच्या घरात का गेला नाही, असा प्रश्न विचारला असता संदेश म्हणाला, मला शोचे आमंत्रण नव्हते. मग मी कसा जाऊ शकतो?. शेवटी हा निर्णय शोच्या निर्मात्यांचा असतो. आणि तसंही मला माझे प्रेमसंबंध खासगी राहावे असे वाटते. त्यामुळे मी तिथे गेलोही नसतो, असे त्याने नमूद केले.

बिग बॉस मराठीमधील रेशम टिपणीस आणि राजेश श्रृंगारपुरेमधील कथित प्रेमसंबंधामुळे वाद निर्माण झाला होता. या दोघांमधील जवळीक हा चर्चेचा विषय ठरली होती. बिग बॉसच्या घरात राजेश आणि रेशमने अश्लील वर्तन केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात नाशिकमध्ये तक्रारही दाखल झाली होती.