वादग्रस्त शो बिग बॉसच्या आगामी सिझनचा पहिला प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ‘बिग बॉस ११’ची चर्चा होती. सलमान खान पुन्हा एकदा या शोमध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. कलर्स वाहिनीने काल रात्री उशिरा या शोचा खळखळून हसण्यास भाग पाडणारा पहिला टीझर प्रदर्शित केला. ब्रिटिश रिअॅलिटी शो ‘बिग ब्रदर’ याचे भारतीय व्हर्जन म्हणजेच ‘बिग बॉस’. या शोमध्ये स्पर्धक जवळपास तीन महिन्यांसाठी एकाच घरात राहतात. त्या दरम्यान, लाइव्ह कॅमेरा या सर्वांवर नजर ठेवतो. शेवटपर्यंत बिग बॉसच्या घरात राहणाऱ्या स्पर्धकाला विजेता म्हणून घोषित करण्यात येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाचा : …म्हणून सलमान खानच्या घरी यावर्षी बाप्पा येणार नाही

सलमान खानच्या आधी ‘बिग बॉस’च्या काही सिझनचे सूत्रसंचालन अर्षद वारसी, अमिताभ बच्चन, शिल्पा शेट्टी, संजय दत्त आणि फराह खान यांनी केले आहे. ‘बिग बॉस’ ही संकल्पना इतकी प्रसिद्ध झाली की त्यामुळे ‘बिग बॉस कन्नडा’, ‘बिग बॉस तमिळ’ आणि ‘बिग बॉस तेलगू’ हे तीन व्हर्जन सुरु करण्यात आले. आतापर्यंतच्या ‘बिग बॉस’च्या सिझनमधील दहावा सिझन हा सर्वाधिक वादग्रस्त होता. सामान्य नागरिकांमधून स्पर्धक म्हणून निवडून आलेले प्रियांका जग्गा आणि स्वामी ओम यांच्यामुळे अधिकाधिक वाद झाल्याचे यात पाहावयास मिळाले. खरं तर सेलिब्रिटींपेक्षा सामान्य लोकांमधून आलेल्या स्पर्धकांनीच प्रेक्षकांचे अधिक लक्ष वेधले होते. अखेर त्यांच्यातूनच आलेला नोएडाचा मनवीर गुर्जर हा ‘बिग बॉस १०’चा विजेता ठरला.

‘बिग बॉस ११’ च्या पहिल्याच प्रोमोमध्ये सलमानचा नेहमीचाच अतरंगी अंदाज पाहावयास मिळतो. सलमान बाल्कनीत उभा राहून झाडांना पाणी घालत असताना पाण्याचे काही थेंब खाली चहा पीत बसलेल्या काकांच्या कपमध्ये पडतात. त्यावर ते सलमानवर डाफरतात. हे बघताच समोरच्या घरातील भाभी त्याला लग्न करण्याचा सल्ला देते. त्यावर सलमान तिला असं काही म्हणतो की ती त्याला ‘हट्ट बेशरम’ असे म्हणते.

वाचा : झोपलेल्या कुत्र्याला विटेने मारल्याने आलिया भडकली

‘बिग बॉस’ आता परत येतोय म्हटल्यावर त्यात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची नावे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता लागून लागली असणार. यंदाच्या सिझनमध्येही सामान्य लोकांमधून येणारे स्पर्धक प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यात यशस्वी होतात की नाही तेसुद्धा लवकरच कळेल. सलमान आठव्यांदा बिग बॉसचे सूत्रसंचालन करणार असून, हा शो ऑक्टोबर महिन्यात सुरु होण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 11 promo salman khan is his usual self in teaser
First published on: 19-08-2017 at 12:32 IST