‘बिग बॉस’चं तेरावं पर्व लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असून दिवसेंदिवस या शोची लोकप्रियता वाढत आहे. सोशल मीडियावर या रिअॅलिटी शोची तुफान चर्चा होत असून स्पर्धकांना दिले जाणारे वेगवेगळे टास्क आणि त्यावरून त्यांमध्ये होणारा वाद चर्चेचा विषय ठरतोय. या पर्वातील सर्वाधिक चर्चेत राहिलेले तीन स्पर्धक म्हणजे सिद्धार्थ शुक्ला, रश्मी देसाई आणि असिम रियाझ. बिग बॉसच्या ट्रॉफीच्या एक पाऊल जवळ जाण्यासाठी या स्पर्धकांना गोरेगाव इथल्या ओबेरॉय मॉलमध्ये एक टास्क देण्यात येणार असल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली. व्हायरल झालेल्या या मेसेजच्या आधारे ‘बिग बॉस’च्या चाहत्यांनी गुरुवारी ओबेरॉय मॉलमध्ये तुडूंब गर्दी केली. पाहता पाहता संपूर्ण मॉल चाहत्यांनी भरला होता. मात्र ‘बिग बॉस’चे स्पर्धक त्या मॉलमध्ये येणारच नसल्याचं ऐनवेळी त्यांना कळलं.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला मेसेज खोटा असल्याचं लोकांना मॉलमध्ये गेल्यावर समजलं. कारण ‘कलर्स’ वाहिनीकडून स्पर्धकांविषयी अशी कोणतीच माहिती अधिकृतरित्या दिली गेली नव्हती. त्यामुळे मॉलमधील गर्दी पांगवताना पोलिसांना नाकीनाऊ आलं होतं.
‘बिग बॉस’ या शोविषयी प्रेक्षकांमध्ये फार क्रेझ आहे. यंदाचा सिझन टीआरपीच्या यादीत चांगलीच बाजी मारत आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या स्पर्धकाची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी मॉलमध्ये गर्दी केली होती.