‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वातील स्पर्धक अभिजीत बिचुकले पहिल्या दिवसापासून चर्चेत आहेत. घरातील वागणूक आणि घडलेले किस्से रंगून सांगणे यासाठी बिचुकले लोकप्रिय आहे. आज बिग बॉसच्या घरात बिचुकले शिवानी, नेहा आणि आरोहला त्यांच्या आयुष्यात घडलेला एक किस्सा सांगत आहेत. हा किस्सा सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी देखील आले आहे.

बिचुकले यांना ताण किंवा दडपण आले की त्यांच्या काही गोष्टी लक्षात राहत नाहीत. एक दिवस ताण आल्यामुळे बिचुकलेंनी असे काही केले आहे की सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. बिचुकले आपल्या पत्नीला घेऊन दुचाकीवर बाहेर गेले होते. त्यावेळी ते थोड्या तणाव परिस्थितीचा सामना करत होते. दरम्यान ते एका पेट्रोल पंपावर दुचाकीमध्ये पट्रोल भरण्यासाठी थांबले. पेट्रोल भरल्यानंतर ते आपल्या पत्नीला न घेता तेथून निघून गेले. ‘मी त्यावेळी खूप तणावात होतो. त्यामुळे माझ्यासोबत माझी पत्नी आहे हे मी विसरुनच गेलो आणि तिला न घेता पेट्रोल पंपावरुन निघून आलो’ असे बिचुकले म्हणाले.

‘एक माणून माझ्या शेजारी गाडी घेऊन आला आणि आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे पाहत होता. तो माझ्याकडे असा का पाहात होता हे मला कळालेच नाही. त्यानंतर आणखी एक जोडपे माझ्या बाजूला आले आणि माझ्याकडे पाहून हसू लागले. माझ्या ओळखीची लोके माझ्याकडे असे का पाहतात हे मला कळेच ना. शेवटी मी पत्नीला विचारण्यासाठी मागे वळलो तेव्हा मला कळाले की मी तिला पेट्रोल पंपावर विसरुन आलो आहे. त्यावेळी मी पूर्णपणे गोंधळून गेलो. आता मी काय करु असा प्रश्न माझ्यासमोर उभा होता आणि माझ्या डोळ्यात पटकन पाणी आले’ असे पुढे बिचुकले यांनी सांगितले. हा किस्सा ऐकून शिवानीने ‘परत गेल्यावर मारले असेल ना तुम्हाला तुमच्या पत्नीने’ असे म्हणाली.