‘बाबूजी’ हे नाव घेतलं की डोळ्यांसमोर एकच व्यक्ती उभी राहते. ती व्यक्ती म्हणजे सर्वांचेच लाडके गायक सुधीर फडके. अनेक पिढ्यांना आपल्या आवाजाने भुरळ पाडणाऱ्या सुधीर फडके यांची आज जयंती आहे. त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने रेडिओ म्हणू नका किंवा मग टेलिव्हिजन प्रत्येक ठिकाणी या गायकाच्याच गाण्यांना, त्यांच्या आठवणींनी उजाळा दिला जात आहे. आपल्या आवाजाने प्रत्येक गाण्यामध्ये जीव ओतणाऱ्या बाबूजींबद्दल किती सांगावं तेवढं कमीच आहे.
‘बाबूजी’ याच नावाने ते या कलाविश्वातही ओळखले जात होते. मुळात त्या नावाशीही अनेकांचं असं एक खास नातं जोडलं गेलं होतं. त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने जागवल्या जाणाऱ्या आठवणींच्या गराड्यात सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर येत आहे. एका युजरने युट्यूबवर हा व्हिडिओ पोस्ट केला असून, त्यात खुद्द बाबूजी ‘कुणीतरी बोलवा दाजिबाला…’ हे गाणं सादर करताना दिसत आहेत. सध्याच्या संगीतप्रेमी तरुण पिढीसाठी बाबूजींचा हा अंदाज तसा नवीनच. त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष गाणं सादर करताना पाहून नकळतच अनेकांच्या चेहऱ्यावर स्मित खुलत आहे.
‘देवमाणूस’ या चित्रपटातील गदिमांनी लिहिलेल्या ‘कुणीतरी बोलवा दाजिबाला’ या गाण्याला बाबूजींनीच संगीतबद्ध केलं होतं. आशा भोसले यांनी मुळ गाणं गायलं होतं. हेच गाणं एका कार्यक्रमादरम्यान ज्यावेळी बाबूजींनी सादर केलं होतं, तेव्हाचाच हा व्हिडिओ असल्याचं पाहताक्षणी लक्षात येत आहे. गाणं गात असतानाही समोर बसलेल्या श्रोत्यांसोबत आपल्या हसऱ्या आणि तितक्याच बोलक्या चेहऱ्याच्या माध्यमातून संवाद साधण्याचं त्यांचं कसब म्हणजे अतुलनीय. मुळात त्यांचं प्रेक्षकांशी असं काही नातं जडलं होतं, ते पाहता नेमकी सुधीर फडके यांची जादू आजही कायम का आहे, याचा अंदाज सहज लावता येत आहे. गाण्यातील खोडकरपणा, वाद्यवृंदासोबत साधलेला सुरेख मेळ आणि गाणं गात असतानाही प्रेक्षकांशी साधलेला संवाद हे सारं पाहता एक अष्टपैलू आणि कलासक्त कलाकार कसा असावा या प्रश्नाचं उत्तर लगेचच मिळून जात आहे.
संगीतकार, गायक म्हणून आपली भूमिका बजावणाऱ्या बाबूजींनी समाजाप्रतीही आपली जबाबदारी ओळखली होती. इतरांना मदत करण्यासाठी ते नेहमीच पुढे असत. त्याशिवाय कलेच्या माध्यमातून जनसेवा करण्याला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिल्याचंही पाहायला मिळालं. बाबूजी आज आपल्यात नसले तरीही त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून ते कायमच प्रेक्षकांच्या मनात असतील हेही तितकच खरं.