scorecardresearch

Premium

Birthday Special: उषा नाडकर्णींना ‘आउ’ का म्हणतात माहित आहे का?

उषा नाडकर्णी या स्पष्टवक्त्या आणि रोखठोक अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहेत.

Usha Nadkarni Birthday
उषा नाडकर्णी यांनी आत्तापर्यंत वैविध्यपूर्ण भूमिका केल्या आहेत. (फोटो-इंस्टाग्राम, उषा नाडकर्णी)

उषा नाडकर्णी हे नाव घराघरात पोहचलं आहे याचं कारण आहे त्यांनी साकारलेली खाष्ट सासू. ‘माहेरची साडी’ हा सिनेमा ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका आणि पर्याय हे नाटक या तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी साकारलेली सासू त्यांना वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते. अत्यंत रोखठोक आणि स्पष्टवक्त्या स्वभावाच्या म्हणून उषा नाडकर्णी प्रसिद्ध आहेत. १३ सप्टेंबर हा त्यांचा वाढदिवस. १३ सप्टेंबर १९४६ या दिवशी त्यांचा जन्म झाला. सुस्पष्ट आवाज, फटकळ स्वभाव आणि रोखठोक बोलणं यामुळे उषा नाडकर्णींचा दबदबा कायम आहे. सिनेमासृष्टी आणि मालिका विश्वात त्या लीलया वावरत आहेत. इंदिरा चिटणीस या त्यांच्या आवडत्या कलाकार आहेत. सुरूवातीच्या काळात त्यांनी महासागर, पुरुष, गुरू या नाटकांमधून कामं केली. त्यानंतर त्या चित्रपट आणि मालिकाही करू लागल्या. त्यांना सिनेमासृष्टीत आउ या नावाने हाक मारली जाते. त्यांना आउ का म्हणतात याचा एक भन्नाट किस्सा आहे.

माहेरची साडी या सिनेमामुळे घराघरात पोहचल्या उषा नाडकर्णी

माहेरची साडी या सिनेमामुळे उषा नाडकर्णी घराघरात पोहचल्या. माहेरची साडी हा अलका कुबल, रमेश भाटकर, उषा नाडकर्णी, अजिंक्य देव, किशोरी शहाणे यांच्या भूमिका असलेला मराठीतला रेकॉर्डब्रेक सिनेमा ठरला होता. या सिनेमाने प्रेक्षकांना सिनेमागृहात अक्षरशः खेचून आणलं होतं. या सिनेमामुळे उषा नाडकर्णी यांची खाष्ट सासू ही ओळख महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर कोरली गेली.

Niharika Konidela reacts on her divorce
उदयपूरमध्ये शाही सोहळ्यात केलं लग्न, वर्षभरातच पतीपासून विभक्त झाली अभिनेत्री; म्हणाली, “मला किती त्रास झाला हे…”
What Tasleema Nasreen Said?
“मला वाटतं शोएब मलिक एक दिवस सना जावेदलाही घटस्फोट देईल आणि…”, तस्लिमा नसरीन यांची परखड शब्दांत टीका
Alyy Khan Kajol kissing scene
“माझा व काजोलचा किसिंग सीन मी पत्नी अन् मुलीबरोबर पाहिला”, अभिनेत्याचा खुलासा; त्यांची प्रतिक्रिया सांगत म्हणाला…
supriya sule rohit pawar
रोहित पवार ईडीसमोर हजर; सुप्रिया सुळे म्हणतात, “केंद्राच्या अधिकृत माहितीनुसार…”

मोहन तोंडवळकर यांच्यामुळे नाटकात काम करण्याची संधी

महासागर, पुरुष, पर्याय, सावित्री अशी कलावैभवची अनेक नाटकं त्यांनी केली. मोहन तोंडवळकर यांच्यामुळे मला काम करण्याची संधी मिळाली असंही त्यांनी मुलाखतीत सांगितलं होतं. नाटक, सिनेमा आणि नोकरी असं सगळं एकाचवेळी त्या करत होत्या. अक्षरशः तारेवरची कसरत म्हणतात तशी त्यांनी केली आहे. उषा नाडकर्णी या माहेरच्या उषा कलबाग. त्यांची आई शाळेत शिक्षिका होती. आई कडक शिस्तीची होती, तिला मी नाटकाचे दौरे करणं, नाटकात काम करणं, लोकांनी त्याविषयी चर्चा करणं हे काहीही आवडत नव्हतं. त्यामुळे माझ्या आई वडिलांचं म्हणणं होतं की मी अभिनय करू नये. मात्र माझ्या कामासाठी जेव्हा बक्षीसं मिळू लागली तेव्हा माझ्या आई वडिलांना समजलं की आपली मुलगी चांगलं काम करून बक्षीसं मिळवते आहे त्यावेळी त्यांनी हे ओळखलं की आपली मुलगी व्यवस्थित काम करते आहे. सुरूवातीला मला हाकलून दिलं होतं घरातून, पण नंतर त्यांनी मला परत घरी बोलवलं. जेव्हा घरी बोलवलं तेव्हा मला खूप समाधान वाटलं होतं असंही उषा नाडकर्णींनी सांगितलं होतं.

ऑडिशनचा भयंकर राग आणि लुक टेस्टचा किस्सा

मी इतकी वर्षे काम करते आहे. आता मला जर कुणी सांगितलं की तुम्हाला ऑडिशन द्यायची आहे तर मला भयंकर राग येतो. मी जर काम करते आहे तुम्ही ते पाहता आहात तर ऑडिशन कशाला घेता? असा माझा प्रश्न असतो. त्यामुळे ऑडिशन देणं हा प्रकार मला आवडत नाही असं उषा नाडकर्णी म्हणाल्या होत्या. त्याचप्रमाणे त्यांनी लुक टेस्टचा एक किस्साही सांगितला होता. ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात त्यांची मुलाखत झाली तेव्हा उषा नाडकर्णी म्हणाल्या, “मला एकदा एकाचा फोन आला तो म्हणाला की तुम्हाला उद्या येऊन लुक टेस्ट द्यायची आहे. त्यावर मी त्याला विचारलं फ्रॉक घालयचा आहे की बिकिनी? माझी कसली लुक टेस्ट घेता?”

आउ हे नाव कसं पडलं?

उषा नाडकर्णी यांनीच याविषयीचा एक किस्सा एका मुलाखतीत सांगितला होता. उषा नाडकर्णी या सिनेमा आणि नाटकांमध्ये काम करत होत्या. त्यावेळी त्यांचा मुलगा लहान होता. त्यामुळे उषा नाडकर्णी या त्याला त्यांच्या आईकडे ठेवून जात. उषा नाडकर्णींचा मुलगा त्यांच्या आईला म्हणजेच त्याच्या आजीला आई म्हणायचा आणि उषा नाडकर्णींना उषा अशी हाक मारायचा. त्यानंतर आजीने त्याला सांगितलं की अरे उषा नाही म्हणायचं आई म्हणायचं. एक दिवस उषा नाडकर्णी घरी आल्या आणि त्यांच्या मुलाने त्यांना आउ अशी हाक मारली. ही बाब उषा नाडकर्णींना खूपच आवडली. त्या म्हणतात, “एक दिवस मी माझ्या मुलाला नशीबवान सिनेमाच्या शुटिंगला घेऊन गेले. तो अगदी लहान दोन ते अडीच वर्षांचा असेल. तिथे तो मला घरात जी हाक मारायचा त्याच नावाने हाक मारत होता. आउ म्हणत होता. अलका कुबलने ते ऐकलं, मग ती पण मला आउ म्हणायला लागली. त्यानंतर समीर आठल्येंनी ऐकलं तो आउ म्हणायला लागला. त्यानंतर हळूहळू सिनेमाचं सगळं युनिटच मला आउ म्हणू लागलं आणि मग मला ते नावच पडलं आता सगळेच मला आउ म्हणतात. आउ हे नाव मला आवडलं कारण त्यात आई मधला ‘आ’ होता आणि उषामधला ‘उ’ होता. माझ्या मुलाने नकळतपणे मला जे नाव दिलं त्याचा मी हा असा अर्थ काढला, पण अलका कुबलमुळे मला आता सगळेच आउ म्हणू लागले आणि मलाही ते आवडतं.” असं उषा नाडकर्णी म्हणाल्या.

विजया मेहतांमुळे मला खूप शिकायला मिळालं

विजया मेहतांमुळे मला खूप शिकायला मिळालं असंही उषा नाडकर्णींनी म्हटलं होतं. त्या म्हणाल्या, एक दिवस मला मोहन तोंडवळकरांनी फोन करून ऑफिसमध्ये बोलवलं. मी त्यांना भेटायला गेले, ते म्हणाले नाटकात काम करशील का? मी त्यांना म्हटलं नाटकात भूमिका देणार असाल तर काम करेनच की. कोण दिग्दर्शक आहे? त्यावर तोंडवळकर म्हणाले विजया मेहता. मला खूप आनंद झाला. विजया मेहत्या माझ्या आवडत्या होत्या, त्यामुळे मी लगेच होकार दिला. विजया मेहतांसह काम करणं म्हणजे जन्माला आल्याचं सार्थक झालं असंच मला वाटतं. मी विजया मेहतांबरोबर पुरुष, महासागर आणि सावित्री ही तीन नाटकं केली. महासागरमध्ये मी गंगूकाकीचं काम करत होते. वाचन सुरु झालं तेव्हा मला त्यांनी सांगितलं असं नाही अजून थोडं म्हाताऱ्या बाईसारखं वाच, नेमका सूर लागला तेव्हा त्या म्हणाल्या तुला असं बोलायचं आहे. नाटकाची तालीम सुरू झाली तेव्हा मी वाकून चालत होते. तेव्हा मला विजयाबाईंनी सांगितलं की असं चालायचं नाही. म्हातारी माणसं चवड्यावर चालतात. तू तसं चाल, ते मला विजयाबाईंनी शिकवलं. विजया मेहतांकडे काम करायचं म्हणजे प्रत्येक गोष्ट का करायची? याचं रिझनिंग असतं. तसंच त्यांच्याकडे काम करताना शिस्त लागते. मनापासून काम करणं हे शिकायला मिळतं. एखादं पात्र इथून इथे का येतं याचंही रिझनिंग आहे. असंही उषा नाडकर्णी म्हणाल्या. तसंच त्यांच्याकडून खूप काही शिकले आहे असंही त्यांनी सांगितलं.

उषा नाडकर्णी यांनी संजय दत्तच्या वास्तव सिनेमात काम केलं आहे. यात त्या देढफुट्याची आई होत्या. देढफुट्या संजय नार्वेकर यांनी साकारला होता. त्याच्या आईची भूमिका उषा नाडकर्णींनी साकारली. अभिनय करायचा असेल तर तुम्हाला सुंदर चेहरा किंवा मेकअप यांची गरज नसते, अभिनय चांगला असेल तर तुम्हाला लोक लक्षात ठेवतात असंही त्यांनी सांगितलं होतं. उषा नाडकर्णी या वागायला खाष्ट असतील असं वाटतं पण त्या तेवढ्याच हळव्याही आहेत, प्रेमळ आणि मिश्किलही आहेत. अशा सुंदर आणि स्पष्टवक्त्या उषा नाडकर्णींना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Birth day special do you know why usha nadkarni is called aau scj

First published on: 13-09-2023 at 07:15 IST

संबंधित बातम्या

×