बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे अभिनेत्री करिश्मा कपूर. आज करिश्माचा वाढदिवस आहे. ती ४७ वर्षांची झाली आहे. २५ जून १९७४ साली करिश्माचा मुंबईत जन्म झाला होता. ती ९०च्या दशकातील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री होती. तिने अभिनयच्या जोरावर अनेकांची मने जिंकली होती. मात्र लग्नानंतर करिश्माचे संपूर्ण आयुष्य बदलले होते. तिने दिल्लीचा व्यावसायिक संजय कपूर याच्याशी लग्न केल्यानंतर ती मोठ्या पडद्यापासून दूर राहिली.

लग्नानंतर करिश्माने चित्रपटांमध्ये काम करणे कमी केले आणि नवीन प्रोजेक्ट्ससुद्धा नाकारले. मात्र तिचे वैवाहिक जीवन फार काही सुखी नव्हते. एका मुलाखतीत करिश्माने सांगितले होते की तिला संजय मारहाणसुद्धा करायचा. इतकच नव्हे तर हनिमूनला संजयच्या मित्रांनी मिळून करिश्माशी गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न केला होता, असेही तिने सांगितले होते.

आणखी वाचा : ‘कपूर कुटुंबीयांनी आईकडे पाठ फिरवली होती’, करीना कपूरचा खुलासा

लग्नानंतर सुरुवातीची काही वर्षे करिश्मा-संजयचे नाते चांगले होते. मात्र पाच-सहा वर्षानंतर या दोघांमध्ये वादविवाद सुरू झाले. २००३ मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली होती आणि २०१६ मध्ये ते विभक्त झाले. करिश्माचा हा प्रेमविवाह होता. जेव्हा करिश्मा व संजय हनिमूनला गेले होते, तेव्हापासून हळूहळू गोष्टी बिघडू लागल्या होत्या. हनिमूनला गेलो असताना संजयने त्याच्या मित्रांना मला विकण्याचा प्रयत्न केला होता, असा धक्कादायक आरोप करिश्माने एका मुलाखतीत केला होता. सासरच्यांनी कधीच मला चांगली वागणूक दिली नाही, असेही ती म्हणाली होती.

संजय व त्याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून करिश्माने २०१२ मध्ये घटस्फोटाचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर आता त्यांची दोन्ही मुले समायरा आणि रिआन ही करिश्माकडेच राहत आहेत.