फिल्मी गॉसिप मॅगझिनना कलाकारांच्या बौद्धिक, मानसिक भावनिक वाढीव्यतिरिक्त इतर सर्वच गोष्टीत रस असतो. त्यात त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो तो म्हणजे अभिनेत्री लग्न कधी करणार? एखाद्या अभिनेत्रीची साधारण करिअरची दहा वर्ष झाली की थेट तिलाच थेट प्रश्न विचारला जातो की तू लग्न कधी करतेस? माधुरी दीक्षित तर या प्रश्नाने इतकी हैराण झाली की ती एक- दोनदा आपल्या मुलाखतीत चक्क म्हणाली, ‘माझ्या आई- बाबांपेक्षाही मिडियाला माझ्या लग्नाची जरा जास्तच काळजी दिसतेय…’ माधुरीचे तरी काय चुकले? कारण काही दिवसातच अन्य एखाद्या चित्रपटाच्या सेटवर कोणीही सिनेपत्रकार म्हणायचा, बरं, शेवटचा प्रश्न, तू लग्न कधी करणार?

पनवेलच्या सुर्वे फार्मवर ‘आरजू’ चित्रपटाच्या सेटवर काही निवडक सिनेपत्रकारांना नेले असता एका दोघांना त्याच प्रश्नात जरा जास्तच रस आहे हे लक्षात येताच माधुरी म्हणाली, ‘तुम्हाला सांगितल्याशिवाय मी लग्न करणार नाही…’ तिच्या बोलण्यातील गंमत त्यांच्या लक्षातच आली नाही ते जाऊ देत. माधुरीने मात्र कोणाच्याही ध्यानीमनी नसताना थेट अमेरिकेत १७ ऑक्टोबर १९९९ रोजी लग्न केले आणि ही ब्रेकिंग न्यूज तिचा सेक्रेटरी रिक्कू याने ५ नोव्हेंबरला एका वाहिनीला दिली आणि तिचे चाहते, चित्रपटसृष्टी तसेच प्रसारमाध्यमांना आश्चर्याचा जोराचा धक्काच दिला.

जुही चावलालाही असा प्रश्न विचारला की ती गप्प राहायची. जय मेहताशी तिने गुपचूप लग्न केले. कुठेही बॅन्ड बाजा बारात नाही. पण तरी हळूहळू कुणकुण सुरु झाली की अंधेरीतील मनिष नगरमध्ये हे सख्खे शेजारी म्हणून राहतात म्हणजेच कुछ तो गडबड है. जुहीने लग्नाची वाच्यता होऊ न देण्यामागचे एक कारण म्हणजे ती आघाडीची अभिनेत्री होती आणि लग्नामुळे आगामी चित्रपटाच्या पूर्वप्रसिध्दीत कदाचित वेगळे वळण आले असते. किमी काटकर याबाबत पूर्ण व्यावसायिक. तिने शंतनु शेवरे याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेताच पटकन नुकतेच सेटवर गेलेले चित्रपट सोडले. त्यामुळेच ‘त्रिनेत्र’ मधील तिची भूमिका शिल्पा शिरोडकरला मिळाली.

कारकीर्द ऐन भरात असतानाच अनेक अभिनेत्रीस लग्नाचा निर्णय घेणे अवघड जाते. आपली मागणी कमी होईल का? लोकप्रियतेत घसरण होईल काय? भूमिकांचे स्वरूप बदलेल काय? असे असंख्य प्रश्न सतावत असतात. एखादी डिंपल कपाडिया कारकिर्दीच्या सुरुवातीलाच लग्न करते. सुपरस्टार राजेश खन्नावर लाखो युवती फिदा असतानाच अचानक ‘बॉबी गर्ल’ त्याची पत्नी होते यावरून त्या काळात केवढी चर्चा रंगली असेल ते विचारूच नका. तेव्हा अख्खा समाज ढवळून निघाला होता. काजोलने कारकिर्दीच्या आहारी न जाता योग्य वयात लग्न केले आणि संसार, मुले व चित्रपट हे सगळेच व्यवस्थित सांभाळले. हे कोणालाही आदर्श ठरावा असेच लग्न ठरते.

सोनम कपूरनेही आपली कारकीर्द दहा वर्षाची होताच लग्न केले हे उत्तमच. आपण अगोदर एक स्त्री आहोत व वयाच्या टप्प्यानुसार काही गोष्टी वेळच्या वेळेसच व्हायला हव्यात हे भान महत्त्वाचे. ग्लॅमरच्या विळख्यात अनेकांना नेमका त्याचाच विसर पडतो. काहींचा अफेअर्समध्ये वेळ जातो. खाजगी वा व्यक्तिगत आयुष्याचे निर्णय घेण्यासाठी फिल्मी संस्कृतीपासून दूर राहता यायला हवे. सोनाली बेंद्रेला ते खूपच छान जमलयं. पूर्वी लग्न झाल्यावर ‘नायिका’ म्हणून ऑफर कमी येतील अशी अघोषित भीती असे. शर्मिला टागोरबाबत तसे अजिबात झाले नाही. मौशमी चटर्जी तर चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वीच विवाहित होती आणि तिची कारकीर्द छान होती. नटीच्या पतीची याबाबत काय भूमिका व भावना आहे हे महत्वाचे आहे. नीतू सिंग कपूर खानदानाची सून होताच तिने चित्रपटसृष्टीतून बाजूला झाली तरी कपूर घराणे आणि चित्रपट असे घनिष्ठ नाते आहे. अंजली जठार (त्रिमूर्तीमधील शाहरुख खानची नायिका) लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाली.

गॉसिप मिडियाचा हाही एक प्रश्न असतो की, लग्नानंतर चित्रपटातून काम करत राहणार का? पण आजचा स्त्री- पुरुष समानतेचा काळ पाहता हा प्रश्नच कालबाह्य झालाय. आज रोमॅण्टिक चित्रपटाचे प्रमाण तसे कमी झालेय. (त्यात नवीन नायक- नायिका असतात) अनेक विषयांवर आज चित्रपट निर्मिती होते त्यामुळेच अभिनेत्रीचे लग्न होणे म्हणजे तिच्या कारकिर्दीचे काय बरे हा प्रश्न पुरातन झालाय. अनुष्का शर्माचे लग्न अगदी ताजे उदाहरण आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिनेत्रीच्या लग्नाच्या गोष्टीत खूप छान बदल झालेत ते महत्त्वाचे. तिच्या भावना समजून घेणे अधिकच आवश्यक. पूर्वी ‘लग्नानंतरची पहिली मुलाखत’ हाही एक प्रकार असे. आता त्याची जागा उपग्रह वाहिन्यांच्या असंख्य कॅमेर्‍याना ‘जनता बाईट’ देण्याने घेतलीय. पण आता अभिनेत्रीचे लग्न हा जणू इव्हेंट होत चालला आहे. ऐश्वर्य राय बच्चन खानदानाची सून झाली तेव्हापासून हा ट्रेंड सुरू झाला.