सलमान खान आणि कतरिना कैफ एकत्र येतात तेव्हा प्रत्येक वेळी अनेकांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्याचे पाहायला मिळते. ऑनस्क्रीन केमिस्ट्रीसाठी ओळखल्या जाणाऱ्या कतरिना आणि सलमानमध्ये असणारी मैत्री आणि एकेकाळी चर्चेत असणारे त्यांचे प्रेमप्रकरण या साऱ्यामुळे ही जोडी प्रकाशझोतात असते. येत्या काही दिवसांत आगामी ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटातून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, सध्या ते या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहेत. या प्रसिद्धीदरम्यान ‘दबंग खान’ आणि कतरिनाने एका डान्स रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली. त्यावेळी एक क्षण असा आला जेव्हा नेहमीच चेहऱ्यावर स्मितहास्य असणाऱ्या कतरिनाला तिचे अश्रू अनावर झाले.
‘डान्स चॅम्पियन्स’ या रिअॅलिटी शोमध्ये आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी आलेल्या सलमान आणि कतरिनासमोर एका स्पर्धकाने ‘तेरे नाम’ चित्रपटातील शीर्षक गीतावर परफॉर्म केले. या गाण्यातील शब्द, त्याची चाल आणि एकंदर ते सर्व वातावरण पाहून कतरिनाचे अश्रू अनावर झाले. चित्रीकरण सुरु असतानाच ती रडू लागली, शेवटी खुद्द सलमाननेच तिला हसवण्याचे प्रयत्न सुरु केले.
वाचा : ब्रिटनच्या शाही विवाहातल्या काही जगावेगळ्या पद्धती तुम्हाला माहितीये?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तो रोमॅण्टिक अॅक्ट पाहून कतरिनाला रडू आले. ज्यामुळे १० मिनिटे चित्रीकरण थांबण्यात आले होते. तिचे रडणे पाहून शेवटी सलमान खाननेच तिला हसवण्याचे प्रयत्न सुरु केले. त्यानंतर सलमान व्यापीठावर गेला आणि त्याने ‘सुलतान’ या चित्रपटातील ‘जग घूमेया’ या गाण्यावर ठेका धरण्यास सुरुवात केली. त्यानंतर नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूजासुद्धा सलमानसोबत नाचण्यासाठी व्यासपीठावर आला. यावेळी सलमानने त्या गाण्यातील ‘सिग्नेचर स्टेप’ही केली. ती स्टेप शिकण्यासाठी आपल्याला १५ ते २० दिवस लागले होते, असेही त्याने स्पष्ट केले. सलमानच्या या प्रयत्नांमुळे कतरिनाच्या चेहऱ्यावर हसू उमटले का, हे त्या कार्यक्रमाचा भाग प्रसारित झाल्यावर कळेलच.