अभिनय क्षेत्रासोबतच चित्रपट दिग्दर्शन आणि निर्मितीमध्येही उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या अभिनेता अजय देवगण याने काही महिन्यांपूर्वी एका चित्रपटाची घोषणा केली होती. अतियश महत्त्वाच्या अशा या प्रोजेक्टचा फर्स्ट लूकही त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता. पण, त्यानंतर मात्र काही कारणांमुळे त्याच्या हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट लांबणीवर गेला. अजयचा तो बहुचर्चित प्रोजेक्ट म्हणजे, ‘तानाजी- द अनसंग वॉरियर’.

चित्रपट निर्मितीसाठीची समीकरणं बदलल्यामुळेच ही दिरंगाई झाल्याचं म्हटलं जात आहे. अतिशय महत्त्वपूर्ण प्रोजेक्टच्या वाटेत अडचणी आलेल्या असल्या तरीही अजयने मात्र या प्रोजेक्टशी कोणतीच तडजोड केली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाकडून अजयच्या बऱ्याच अपेक्षा आहेत. त्याशिवाय येत्या काळात या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा तो स्वत:च्या खांद्यांवर घेणार असल्याच्याही चर्चा आहे. इतकच नव्हे, तर इतिहासातील हे महत्त्वाचं पान ३डी स्वरुपात प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा त्याचा मानस असल्याचंही म्हटलं जात आहे.

VIDEO : अशी होती प्रवासवेड्या मित्राची अनोखी विश्वभ्रमंती

सध्याच्या घडीला या चित्रपटाच्या प्री प्रॉडक्शनचं काम अतिशय वेगाने सुरु असून, चित्रपटाचा सेट बनवण्याचं कामही सुरु आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होण्याची चिन्हं आहेत. महाराष्ट्राच्या कडेकपारीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या शौर्यगाथांचे सूर आजही गुंजत आहे. महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या या पराक्रमांबद्दल आजवर बऱ्याच साहित्यातून आणि चित्रपटांमधून आपल्याला माहिती मिळाली आहे. याच सुवर्णमय इतिहासाची दखल आता ‘तानाजी….’च्या निमित्ताने बॉलिवूडनेही घेतली असं म्हणायला हरकत नाही.