आपल्या अभिनय कौशल्याने नेहमीच प्रेक्षकांची दाद मिळवणारा अभिनेता म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी. विविध धाटणीच्या भूमिका साकारत नवाजने आजवर रुपेरी पडद्यावर लहानातील लहान भूमिका तितक्याच ताकदीने प्रेक्षकांसमोर मांडली. असा हा अभिनेता आगामी ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ या चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकतेच या चित्रपटातील नवाजची पहिली झलक सादर करण्यात आली. ‘बाबूमोशाय बंदूकबाज’च्या निमित्ताने सर्वांसमोर आलेला चित्रपटाचा पोस्टर पाहता त्यातील नवाजच्या भूमिकेविषयी कुतूहल पाहायला मिळते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या पोस्टरमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीचा चेहरा दिसत नसला तरीही पाठमोऱ्या नवाजकडे पाहता तो एका कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबातील पुरुषाच्या रुपात दिसतो आहे. त्याने घातलेली मळकट लुंगी, गंजी आणि एकंदर देहबोली पाहता तो सर्वांचे लक्ष वेधत असून, इथे लक्ष वेधणारी बाब म्हणजे नवाज निसर्गाच्या हाकेला ओss देण्यासाठी जाताना दिसत आहे. पण, निसर्गाच्या हाकेला ओss देण्यासाठी जाणाऱ्या ‘बाबूमोशाय’च्या कमरेला मागे बंदूक अडकवलेली दिसते. त्यामुळे ही बंदूक नेमकी कशासाठी..? असा प्रश्न सध्या प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे.

‘बाबूमोशाय बंदूकबाज’ या चित्रपटामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी एका कॉन्ट्रॅक्ट किलरच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जातेय. नवाजुद्दीनच्या जोडीनेच या चित्रपटामध्ये अभिनेता ताहिर राज भसिनसुद्धा झळकणार असून, या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री चित्रांगदा सिंग बऱ्याच काळानंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे. हटके पोस्टरमुळे सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ या चित्रपटाचे दिग्दर्शन कुशन नंदीने केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor nawazuddin siddiqui starer babumoshai bandookbaaz first look
First published on: 29-03-2017 at 16:53 IST