लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे सध्या सगळेच पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. यामध्ये भाजपा आणि काँग्रेस पक्षात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यात काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाने त्यांच्या ऑफिशियल ट्विटर हॅण्डलवर पंतप्रधान मोदींवर टीका करणारा व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ पाहुन बॉलिवूड अभिनेता आर. माधवनने पंतप्रधान मोदींना पाठिंबा देत काँग्रेसने शेअर केलेल्या व्हिडिओचा निषेध केला आहे.

काँग्रेसच्या ट्विटर हॅण्डलवर १४ मार्चला सकाळी ९.१२ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्यातील संवादाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ एडिट केलेला असून यात पंतप्रधान मोदी यांची खिल्ली उडविण्यात आली आहे. त्यासोबतच #HugplomacyYaadRakhna हा हॅशटॅगही वापरण्यात आला आहे. त्यामुळे सध्या काँग्रेसचं हे ट्विट चांगलंच व्हायरल होताना दिसत आहे. हे ट्विट पाहिल्यानंतर माधवनने त्याची नाराजी व्यक्त केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“सध्या देशात निवडणुकीची धामधूम सुरु असल्यामुळे प्रत्येक पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारच. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या देशाचं पंतप्रधान आहेत. त्यांच्यावर अशी टीका करणं योग्य नाही. या व्हिडिओमध्ये तुम्ही त्यांच्यावर टीका करताय पण ही टीका करत असताना चीनसमोर आपल्याच राष्ट्राची बदनामीही करताय. काँग्रेससारख्या मोठ्या पक्षाकडून ही गोष्ट होणं खरंच अपेक्षित नव्हतं”, असं आर. माधवनने म्हटलं आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणूक २०१९ चा बिगुल वाजलं आहे. निवडणूक आयोगाने देशातील ५४३ लोकसभा मतदारसंघासाठी निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. एकूण ७ टप्प्यात निवडणुका होणार असून निवडणुकीची घोषणा होताच देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.