अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी जास्त वेळ देताना दिसत आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘संजू’ या चित्रपटातून रणबीर अभिनेता संजय दत्तच्या मध्यवर्ती भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्याच्या याच चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. ज्यामध्ये रणबीरने या चित्रपटासाठी नेमकी किती मेहनत घेतली याचा अंदाज लावता येणं सहज शक्य झालं आहे. एखाद्या भूमिकेला पूर्णपणे न्याय देण्यासाठी झटणाऱ्या कलाकारांच्या यादीत रणबीरच्या नावाचाही समावेश आहे, असंच त्याने साकारलेला ‘संजू’ पाहून अनेकांचं म्हणणं आहे. ‘संजू’च्या ट्रेलरमधील प्रत्येक दृश्य बरंच काही सांगून जात आहे. असंच एक दृश्य म्हणजे रणबीरने साकारलेला तो न्यूड सीन.
संजय दत्त ज्यावेळी कारागृहात होता त्यावेळचंच हे दृश्य असल्याचं लक्षात येत आहे. याच दृश्याविषयी, त्या न्यूड सीनविषयी रणबीरला ज्यावेळी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने अत्यंत महत्त्वाची गोष्ट सर्वांसमोर ठेवली. ”मी तर याआधीही न्यूड सीन केला आहे. ‘सावरिया’च्या वेळी माझा टॉवेलच खाली पडला होता. मुळात मी स्वत: खुप जास्त लाजरा आहे. पण, ज्यावेळी कॅमेऱ्यासमोर असा एखादा सीन देण्याची वेळ येते तेव्हा मात्र एखाद्या गोष्टीविषयीची लाज किंवा इतर भावनाच न्यूड होऊ देण्याची गरज असते.”
वाचा : Top 5 : ‘संजू’आधीही ‘या’ वास्तवदर्शी बायोपिकने जिंकलेली प्रेक्षकांची मनं
संजय दत्तच्या आयुष्यातील या प्रसंगावर ‘संजू’मधून प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यासोबतच रणबीरचं अभिनय कौशल्यही पणाला लागलं आहे. या न्यूड सीनवेळी त्याच्या चेहऱ्यावर असणारे भाव बरंच काही सांगून जात आहेत. तेव्हा आता अतिशय संवेदनशील अशा काही प्रसंगाना रुपेरी पडद्यावर उतरवण्यात राजकुमार हिरानी यशस्वी होतात का आणि हा ‘संजू’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.