‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून दिल्लीतील उत्साही युवकाची भूमिका साकारणारा रणवीर सिंग सध्या बॉलिवूडमध्ये आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातोय. रुपेरी पडद्यावर त्याचा वावर आणि दिवसागणिक आणखीनच प्रभावी होणारं त्याचं अभिनय कौशल्य या गोष्टींच्या बळावर रणवीरने या कलाविश्वात शाहरुख, सलमानची स्पर्धा असतानाही स्वत:चा चाहतावर्ग निर्माण करण्यात यश मिळवलं. सध्याही ‘पद्मावत’ या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर रणवीर त्याच्या कामाप्रती जास्तच समर्पक वृत्तीने लक्ष देत आहे. या चित्रपटाच्या यशामुळे त्याने मानधनातही वाढ केल्याचं वृत्त ‘डेक्कन क्रोनिकल’ने प्रसिद्ध केलं आहे.
वाचा : दास्तान- ए- मधुबाला भाग-१
चित्रपटासाठी यापुढे रणवीर कमीत कमी १३ कोटी रुपये इतकं मानधन आकारणार आहे. याआधी रणवीर एका चित्रपटासाठी ७ ते ८ कोटी रुपये इतकं मानधन घ्यायचा. पण, आता चित्रपटाला मिळालेलं यश आणि आपल्या कामाचा योग्य मोबदला म्हणूनच त्याने मानधनाचा आकडा वाढवल्याचं कळत आहे.
वाचा : दास्तान- ए- मधुबाला भाग-२
कोणतीही भूमिका साकारताना सर्वस्व अर्पण करुन त्यासाठी झटणाऱ्या रणवीरने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पण, भन्साळींच्या दिग्दर्शनात साकारलेल्या ‘पद्मावत’ने त्याच्या अभिनय कारकिर्दीला एक वेगळीच कलाटणी दिली हे खरं. या चित्रपटातून त्याने पहिल्यांदाच नकारात्मक (अलाउद्दीन खिल्जी) भूमिका साकारण्याचं धाडस केलं. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांचीही पसंती मिळाली असून, रणवीरच्या अभिनयाचं नाणं पुन्हा एकदा खणखणीत वाजलं, अशीच प्रतिक्रिया अनेकांनी दिली. सध्याच्या घडीला रणवीर झोया अख्तरच्या ‘गल्ली बॉय’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र असून, आता आणखी एका आव्हानात्मक भूमिकेसाठी तो मेहनत घेतोय.