केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. २६ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांनी या आंदोलनाला सुरुवात केली आहे. दिल्ली सीमेवर सध्या हे आंदोलन सुरु असून देशभरात अनेकांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे. यामध्येच रितेश देशमुखपासून ते दिग्दर्शक हंसल मेहतापर्यंत अनेकांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या आंदोलनादरम्यान केंद्र सरकारसोबत शेतकऱ्यांची पाच वेळा बैठक झाली आहे.मात्र, अद्याप या मुद्द्यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यातच पंजाबी कलाकारांसह बॉलिवूडमधील काही कलाकारदेखील सोशल मीडियावर व्यक्त झाले असून त्यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे. यात रितेश देशमुख, सोनम कपूर,आनंद आहुजा, दिग्दर्शक हंसल मेहता, सनी देओल यांनी पाठिंबा दिला आहे.

‘आज जर तुम्ही जेवण करत आहात, तर शेतकऱ्यांचे आभार माना’. मी देशातील प्रत्येक शेतकऱ्यासोबत उभा आहे, असं ट्विट रितेश देशमुखने केलं आहे. त्याच्याप्रमाणेच सोनम कपूरनेदेखील इन्स्टाग्रामवर शेतकऱ्यांचा एक फोटो शेअर केला आहे. त्यासोबत तिने लेखक डेनियल बेवस्टरचं वाक्य कॅप्शन म्हणून दिलं आहे.

‘जेव्हा शेती केली जाते, तेव्हा इतर कला अनुसरल्या जातात. त्यामुळे शेतकरी हे मानवी संस्कृतीचे संस्थापक आहेत’, असं सोनमने कॅप्शन दिलं आहे. सोनमसोबत तिचा पती आनंद आहुजानेदेखील शेतकऱ्यांचा एक फोटो शेअर केला आहे.

विशेष म्हणजे अभिनेता आणि भाजपा खासदार सनी देओल यांनीदेखील पहिल्यांदाच ट्विट करत शेतकरी आंदोलनावर व्यक्त झाले आहेत. ‘मी शेतकऱ्यांसोबत आहे’, असं म्हणत सनी देओल यांनी एक मोठी पोस्ट शेअर केली आहे.

दिग्दर्शक हंसन मेहता यांनी ‘मी शेतकऱ्यांसोबत उभा आहे’, असं म्हणत ट्विट केलं आहे. तर, ‘जो बोले सो निहाल’, असं ट्विट दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी केलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actors support farmers protest ssj
First published on: 07-12-2020 at 12:39 IST