‘खुबसूरत गर्ल’, बॉलिवूडची ‘फॅशनिस्टा’ अशा विविध नावांनी ओळखली जाणारी अभिनेत्री सोनम कपूर नेहमीच तिच्या स्टाईल स्टेटमेंटमुळे चर्चेत असते. एखाद्या डिझायनर आऊटफिटसोबत काही अफलातून अॅक्सेसरीजची जोड देत मोठ्या आत्मविश्वासाने डोळे दिपवून टाकणाऱ्या लूकमध्ये सोनम बऱ्याचदा चाहत्यांच्या समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकलेल्या या अभिनेत्रीने आता पुन्हा एकदा आपल्या करिअरकडे मोर्चा वळवल्याचं पाहायला मिळत आहे. ज्याची अगदी दणक्याच सुरुवात झालीये, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्याच्या घडीला  Festival De Cannes म्हणजेच कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी गेलेली सोनम परदेशातही तिच्या नववधू रुपात अनेकांचीच मनं जिंकत आहे. १४ मे रोजी ही ‘खुबसूरत गर्ल’ सुरेख अशाच एका रुपात कानच्या रेड कार्पेटवर अवतरली. सोनम त्या ठिकाणी येताच ‘ती आली… तिने पाहिलं आणि तिने जिंकलं’ अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळाली. सोनम आणि तिचा प्रियकर आनंद अहूजा यांच्या लग्नाला काही दिवस उलटून गेले असले तरीही तिच्यावर असणारा ‘ब्रायडल फिव्हर’ काही केल्या जाण्याचं नाव घेत नाहीये हे तिचा कानमधील लूक पाहून म्हणावं लागेल.

वाचा : लग्नसोहळ्यात सहकार्य केलेल्या प्रत्येकालाच सोनम म्हणतेय…

सोनमने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन या लूकबद्दल काही महत्त्वाची माहितीसुद्धा दिली. ‘राल्फ अँड रुसो’च्या सफेद डिझायनर लेहंग्याला सोनमने पसंती दिली होती. तर त्याला शोपार्डच्या कर्णफुलांची जोड दिली होती. सोनमच्या हातांवर असणारी लग्नाची मेहंदी तिच्या या लूकला आणखीनच उठावदार करुन जात होती, तर एका साध्या वेणीवर असलेला अम्रपाली परांदा तिचा लूक परिपूर्ण करुन जात होता. सोशल मीडियावर तिच्या या लूकची सध्या बरीच चर्चा असून कानमध्येही नववधू सोनमचीच हवा आहे, असं म्हणायला हरकत नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress newly wed sonam kapoor stunning desi look at festival de cannes 2018 watch pics and video
First published on: 15-05-2018 at 10:57 IST