बॉलिवूडमधील कलाकारांचे कपडे कायमच चर्चेचा विषय असतात. अगदी एखाद्या पुरस्कार सोहळ्यातील रेड कार्पेट लूक असो, एअरपोर्ट लूक असो किंवा अगदी जीममधील लूक असो सेलिब्रिटीजच्या कपड्यांची कायमच चर्चा होताना दिसते. अनेकदा कपड्यांवरुन सेलिब्रिटीज ट्रोलही होताना दिसतात. असंच झालं ‘प्‍यार का पंचनामा’, ‘सोनू के टीटू की स्‍वीटी’ या चित्रपटांमुळे लोकप्रिय झालेले अभिनेत्री नुसरत भरुचाबरोबर.

रविवारी मुंबईमध्ये पार पडलेल्या फिल्मफेअर पुरस्कार २०२० सोहळ्याचा कर्टन रेजर कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली. रेड कार्पेटवरील अनेक सेलिब्रिटीजचा लूक चर्चेत राहिला. मात्र नुसरतने सेलिब्रिटीजच्या गर्दीत आपल्या हटके ड्रेसने सर्वांच्या नजरा वेधून घेतल्या. याच ड्रेसमधील स्वत:चा एक हॉट फोटो नुसरतने नुकताच इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. पुरस्कार सोहळ्यातील आपला लूक चाहत्यांना दाखवण्यासाठी नुसरतने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये मोरपीसी रंगातील ड्रेसमध्ये नुसरत खूपच सुंदर दिसत आहे.

या ड्रेसवरुन अनेकांनी नुसरतचे कौतुक केलं. “उफ… तू छान दिसत आहेस,” अशी कमेंट अभिनेत्री सोनाली सेहगलने केली. मात्र या फोटोवर अनेकांनी नुसरतला ट्रोलही केलं. एका फॉलोरने ‘आज कालचे फॅशन डिझायनर कुठे कात्री लावतील सांगता येत नाही,’ असं म्हटलं आहे. तर दुसऱ्या एक फॉलोअरने, ‘अरे आपल्या देशात किती गरिबी आली आहे,’ अशी कमेंट केली आहे.


काही दिवसांपूर्वी परदेशातील ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यामध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्राने घातलेल्या डीपनेक गाऊनवरुन अनेकांनी तिला ट्रोल केलं होतं.