बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे आणि चौकटीबाहेरील भूमिकांमुळे चर्चेत येते. सोशल मीडियावरही ही अभिनेत्री बऱ्यापैकी सक्रिय आहे. पण, राधिकाने नुकतच केलेलं ट्विट पाहता तिच्यासमोर एक अडचण आल्याचं कळतंय. कारण, तिचं फेसबुक अकाऊंट हॅक झालं आहे.

राधिकाने तिच्या ट्विटरवरुन यासांबधीची माहिती दिली. ‘माझं फेसबुक अकाऊंट पुन्हा हॅक झालं असून, कृपया मला मेसेंजरवर मेसेज करु नका’, असं ट्विट तिने केलं. शनिवारी अनेकांनाच फेसबुकवर लॉग इन करण्यात काही अडचणी येत होत्या. अनेकांना काही पोस्ट शेअर आणि लाइक करण्यात अडचणी येत होत्या. त्याचदरम्यान राधिकाला आपलं अकाऊंट हॅक झाल्याचं लक्षात आलं. हल्ली सायबर क्राइमचं वाढतं प्रमाण टाळण्यासाठी इंटरनेटवरील प्रत्येकहालचालीवर सुरक्षा यंत्रणाही नजर ठेवून आहेत. पण, असं असूनही अनेकजण सायबर क्राइमचे शिकार होत आहेत. मुख्य म्हणजे सेलिब्रिटींचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचंही लक्षात येत आहे.

वाचा : जगभरात फेसबुक ही सोशल नेटवर्किंग वेबसाईट डाऊन?

दरम्यान, राधिका सध्या तिच्या आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. आगामी ‘बाजार’ या चित्रपटामध्ये ती सैफ अली खानसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. त्याशिवाय नवाजुद्दीन सिद्दीकीसोबतही ती लवकरच एका टेलिव्हिजन सीरिजमध्ये झळकणार आहे. ही सीरिज नेटफ्लिक्सवर प्रसारित करण्यात येणार असून, राधिका त्यात ‘रॉ एजंट’च्या भूमिकेत दिसणार असल्याचं म्हटलं जातंय.