‘शर्मिली’, ‘लाल पत्थर’, ‘आँचल’, ‘कसमे वादे’, ‘कभी कभी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारी अभिनेत्री म्हणजे राखी. निखळ सौंदर्य आणि बरंच काही सांगणारे त्यांचे बोलके डोळे यावर आजही अनेकजण फिदा आहेत. गेल्या काही वर्षांपासून राखी प्रसारमाध्यमांसमोर फार कमी आल्या. मुख्य म्हणजे ज्येष्ठ कलाकार मंडळी चित्रपटसृष्टीत सक्रिय नसले तरीही विविध कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावतात. पण, राखी मात्र अशा कार्यक्रमांनाही जाणं टाळतात. प्रसिद्धीच्या झोतात असताना त्यांचं असं अचानक नाहीसं होण अनेकांनाच खटकलं.
काही वेबसाइट्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार राखी सध्या मायानगरी मुंबईपासून दूर पनवेल येथे राहतात. त्यांची जीवनशैली फार बदलली असून, त्या आता पहिल्याप्रमाणे खळखळून हसत नाहीत, फार काही बोलत नाहीत. स्वत:च्याच विचारात मग्न असतात. सध्या सोशल मीडियावर राखी यांचे काही फोटो व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून प्रथमदर्शनी या राखीच आहेत ना, असा प्रश्न पडतो. कारण, या फोटोंमध्ये त्यांच्यात फारच बदल झाल्याचं लक्षात येतं. वयोमानानुसारही राखी बऱ्याच थकल्याचं लक्षात येतंय.
‘मेरे करण- अर्जुन आएंगे….’, असं म्हटलं की राखी यांचाच चेहरा सर्वांसमोर येतो आणि तेव्हाच एकेकाळी चित्रपटसृष्टी गाजवणारी ही अभिनेत्री सध्या काय करत असेल, हा प्रश्नही अनेकांच्याच मनात घर करतो. चित्रपट विश्वात राखी यांना जितकं यश मिळालं तितक्याच त्या खासगी आयुष्यात अपयशी ठरल्या. गीतकार गुलजार यांच्याशी विवाहबंधनात अडकल्यानंतर राखी यांनी चित्रपटांमध्ये काम न करण्याचा निर्णय घेतला. पण, त्यानंतर मात्र त्यांच्या नात्याला तडा गेला आणि गुलजार- राखी वेगळे झाले. नात्यांमध्ये आलेल्या या वादळाने त्यांच्या आयुष्यावर बराच परिणाम केला. राखी आणि गुलजार यांनी घटस्फोट घेतला नसून, ते फक्त वेगळे झाले आहेत असं म्हटलं जातं. काही महिन्यांपूर्वी रंगपंचमीच्या दिवशी त्या दोघांचेही एकत्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.