कॅनेडियन पॉप स्टार जस्टिन बिबर भारतात येणार असल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते आहे. पर्पज वर्ल्ड टूर या संकल्पनेअंतर्गत जस्टिन भारतात येणार असून, लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गाणारही आहे. त्याच्या या कार्यक्रमामध्ये विविध बी-टाऊन सेलिब्रिटीसुद्धा सहभागी होणार असून, या कार्यक्रमाला बॉलिवूडचा तडकाही मिळणार आहे. जस्टिनच्या ‘पर्पज वर्ल्ड टूर’ या कार्यक्रमात परफॉर्म करणाऱ्यांच्या यादीत दीपिका पदुकोण, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, आलिया भट्ट, झेन मलिक यांच्या नावांचा समावेश आहे. जस्टिनच्या याच कार्यक्रमामध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासुद्धा सहभागी होणार असल्याचे म्हटले जात होते. पण, सोनाक्षीने स्वत: ट्विट करत ती या कार्यक्रमाचा भाग होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

गायक कैलाश खेरच्या एका वक्तव्यानंतर गायक आणि कलाकार अशा नव्या वादाला तोंड फुटलं. कैलाशच्या मताशी सहमत होत अरमान मलिकनेही अभिनय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कलाकारांच्या गायनावर नाराजीचा सूर आळवला होता. अरमानने त्याचे म्हणणे पटवून देण्यासाठी सोनाक्षी सिन्हाच्या बातमीची जोड दिली. त्यानंतर सोनाक्षी आणि अरमानमध्ये ट्विटरवर खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. या ट्विटर वॉरचीच चर्चा बी-टाऊनमध्ये सुरु असताना सोनाक्षीने पुन्हा एक ट्विट करत ती जस्टिनच्या कार्यक्रमात परफॉर्म करणार नसल्याचे सांगत ‘जस्ट चिल.. चिल.. चिल..’ असे म्हणत ट्विट केले आहे.

वाचा: सोनाक्षी, अरमानमध्ये ट्विटर वॉर

दरम्यान, अरमानने केलेल्या ट्विटचे उत्तर देत सोनाक्षीने लिहिले होते की, ‘यशस्वी कलाकार दुसऱ्या कलाकाराला नाउमेद करत नाहीत. उलट अशा कलाकाराने दुसऱ्या कलाकाराला प्रोत्साहन दिले पाहिजे. कोणत्याही पद्धतीने कला दडपली जाणार नाही याची काळजी घ्यायला हवी.’ इतक्यावरच न थांबता तिने अरमानचा समाचार घेतला. ‘अभिनेत्याने फक्त अभिनयच करावा असे जर अरमानचे मत असेल तर त्याने एकदा माझ्याकडे एक गाणं गाण्याची विनंती का केली होती?’ असा प्रश्नही तिने यावेळी उपस्थित केला होता.