‘खुबसुरत गर्ल’ सोनम कपूर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचे फोटो बघून नक्कीच तुमच्या मनात इर्ष्या निर्माण होईल. अभिनेत्री सोनम कपूर नुकतीच तिचा प्रियकर आनंद अहुजासोबत न्युयॅार्कला रवाना झाली होती. गेल्या बऱ्याच दिवसांपासून सोनम आणि आनंदच्या प्रेमाच्या चर्चा बी- टाऊनमध्ये रंगत आहेत. या बहुचर्चित जोडीवर सध्या माध्यमांच्याही नजरा असतात. त्यातच हे दोघंही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असल्यामुळे त्यांच्या नात्याचा अंदाज लावता येणं सहज शक्य आहे.

नुकतेच आनंदने सोनमसोबत न्यूयॅार्कच्या रस्त्यावर फेरफटका मारतानाचा फोटो शेअर केला. हा फोटो पाहता ते दोघंही एकमेकांची कंपनी एन्जॉय करत आहेत. कोणतही भलंमोठं कॅप्शन न देता आनंदने नुसतंच ‘सन्डे’ असं लिहित हा फोटो पोस्ट केला आहे. बरं, ‘सन्डे’ लिहिण्यातही त्याने यात सूर्याच्या चिन्हाचा वापर केला आहे. तेव्हा सोनमचा हा ‘सन्डे’ खऱ्या अर्थाने ‘आनंद’दायी होता, असं म्हणायला हरकत नाही.
बी- टाऊनच्या या फॅशनेबल कपलचे फोटो चर्चेत येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीसुद्धा त्यांच्या बऱ्याच फोटोंनी अनेकांचं लक्ष वेधलं होतं. इतकच काय, तर येत्या काळात हे दोघंही विवाहबंधनात अडकणार असल्याच्याही चर्चा होत्या. पण, त्याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती अद्यापही समोर आलेली नाही.

वाचा : ….म्हणून राजेश खन्ना यांनी बदलली होती त्यांच्या वरातीची वाट

सध्या चित्रपटांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत सोनम आनंदसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. फक्त सुट्ट्यांपुरताच नाही तर, विविध कौटुंबिक कार्यक्रमांनाही आनंद हजेरी लावतो. त्यामुळे तो कपूर कुटुंबाचा एक अविभाज्य भाग झाला आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. सध्या सोनम ‘पॅडमॅन’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र असून, या चित्रपटाच्या निमित्ताने ती खिलाडी कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. याशिवाय ती संजय दत्तच्या बायोपिकमधूनही ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.