सशक्त नायिका लोकांसमोर आणायच्या तर मुळात अभिनेत्रींनी स्वत: तसे चित्रपट करण्यावर ठाम राहिलं पाहिजे. मात्र बॉलीवूडची व्यावसायिक गणितं साधताना फार थोडय़ा हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या अभिनेत्री हे धाडस करताना दिसतात. तापसी पन्नू हे या अभिनेत्रींमधलं सध्याचं आघाडीवरचं नाव आहे. एकाच वर्षांत ‘साँड की आँख’, ‘गेम ओव्हर’, ‘बदला’, ‘मिशन मंगल’ आणि  आता ‘थप्पड’सारखा चित्रपट देणाऱ्या तापसीने आपली स्वत:ची वेगळी ओळख, वेगळी जागा या इंडस्ट्रीमध्ये निर्माण केली आहे. एकापाठोपाठ एक वेगवेगळ्या सामाजिक विषयांना हात घालणारे चित्रपट करण्यामागची तिची नेमकी प्रेरणा काय असेल? यावर बोलताना ‘थप्पड’सारखा चित्रपट समाजात लगेच बदल घडवून आणू शकत नाही, मात्र ज्या विषयांवर बोलायला हवं त्यावर निदान समाजात एक संवाद घडवून आणण्याची सुरुवात चित्रपट करू शकतो. हीच त्याची ताकद आहे आणि त्या विचारानेच मी असे चित्रपट करत आले आहे, असे ती म्हणते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘थप्पड’ हा चित्रपट आपल्यासाठी खूप जिव्हाळ्याचा आहे, असं तापसी सांगते. या चित्रपटाच्या बाबतीत पटकथा माझ्याकडे आली आणि मी होकार दिला असं झालेलं नाही. ‘मुल्क’ असेल किंवा ‘आर्टिकल १५’सारखी या चित्रपटाची पटकथा दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्याकडे तयार नव्हती. ‘मुल्क’ चित्रपटाचे प्रसिद्धी कार्यक्रम सुरू असताना मी त्यांच्याशी या विषयावर बोलले होते.  मला यावर चित्रपट करायचा आहे, असं त्यांना म्हटलं होतं. त्यांच्याही डोक्यात तो विचार होता, त्यामुळे यावर चित्रपट व्हायला हवा याबद्दल आमचं एकमत झालं होतं. ‘आर्टिकल १५’चं चित्रीकरण संपलं आणि त्यांनी लगोलग माझ्या हातात पटकथा ठेवली. ज्या पद्धतीने या चित्रपटाचा जन्म झाला आहे तो खास आहे, असं ती म्हणते. स्त्रियांना प्रत्येक गोष्टीत जुळवून घ्यावं लागतं. अगदी प्रत्येक गोष्टीत.. ‘थप्पड’ चित्रपटाच्या प्रोमोमध्येही तुम्हाला दिसेल की नायिकेला सांगितलं जातं तू नवऱ्याशी जुळवून घे. तिला नवऱ्याने थप्पड मारली ते विसरून जा आणि आपापसांत बोलून पुढे व्हा.. इतपतच ते मर्यादित नाही आहे. हा खरं म्हणजे संवाद घडवून आणण्याचाच विषय आहे. तुम्ही जेव्हा असा विषय थेटपणे चित्रपटातून समजा एक पाचशे जणांच्या समूहासमोर मांडत आहात. तेव्हा तो पाहणाऱ्यांना एकतर अवघडलेपण येतं. कारण ते त्यांच्या कुटुंबाबरोबर, मित्रमंडळींबरोबर आलेले असतात. त्यांना त्यांच्यासमोर अशा पद्धतीचा विषय येणं फारसं सहजपणे घेता येत नाही. किंवा दुसरी प्रतिक्रिया होते ती म्हणजे माणूस त्यावर विचार करायला लागतो, तो याबाबतीत आपण कुठे आहोत, याची चाचपणी करतो.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress taapsee pannu speak about movie thappad zws
First published on: 08-03-2020 at 04:32 IST