जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जाचा आधार असलेला ‘कलम ३७०’ रद्द करण्याचे ऐतिहासिक पाऊल मोदी सरकारने सोमवारी उचललं. त्याचबरोबर राज्याचे विभाजन करून जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करण्यात आले. हा निर्णय होत नाही तोच आता बॉलिवूड निर्माते या विषयावर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या नावासाठी आता निर्मात्यांमध्ये चढाओढ लागली आहे.
या चित्रपटाला ‘Article 370’ किंवा ‘धारा 370’ असं नाव देण्यासाठी अनेक निर्मात्यांनी ‘इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशन’कडे (IMPPA) रांगा लावल्या आहेत. यामध्ये ‘कश्मीर हमारा है!’ हे नाव विशेष लोकप्रिय ठरत असून या नावासाठी तब्बल २० ते ३० निर्मात्यांनी नोंदणी केली आहे.
‘द क्विंट’नुसार, कलम ३७० रद्द करण्याची प्रक्रिया सुरु झाल्यापासून या विषयावर आधारित चित्रपटाच्या नावाची नोंदणी करण्यासाठी चढाओढ सुरु केली आहे. यामध्ये ‘कश्मीर हमारा है’, ‘धारा 35A’, ‘धारा 370’ अशी काही नावे असोसिएशनकडे नोंदणीसाठी आली आहेत. त्यामुळे लवकरच IMPPA ही निर्मात्यांची संघटना आलेल्या अर्जांवर आपला निर्णय देणार आहे. दरम्यान, यापूर्वी ‘पुलवामा’, ‘अभिनंदन’, ‘बालाकोट’ या शीर्षकांसाठी निर्मात्यांनी संघटनेकडे रिघ लावली आहे.