भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची लेक इशा अंबानी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. आनंद पिरामल इंटरप्रायजेसचे मालक अजय पिरामल यांचा मुलगा आनंद याच्यासोबत इशा लग्न करणार असून त्यांचा लग्नसोहळा आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे अंबानी आणि पिरामल या दोन्ही घरी लग्नाची धामधूम सुरु झाली आहे. सध्या या दोन्ही कुटुंबामध्ये लग्नापूर्वीचे कार्यक्रम सुरु झाले असून नुकताच त्यांचा संगीत सोहळा झाला. या सोहळ्यामध्ये बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावली होती. विशेष म्हणजे यावेळी ऐश्वर्या-अभिषेकसह अन्य कलाकारांनी बॉलिवूड गाण्यांवर ठेका धरल्याचंही पाहायला मिळालं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या सेलिब्रेटी डेस्टिनेशन वेडिंगला प्राधान्य देत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसापूर्वी अभिनेत्री प्रियांका चोप्रा-निक जोनास यांनी राजस्थानमधील जोधपूरमध्ये डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं. त्यानंतर आता इशा-आनंदनेदेखील डेस्टिनेशन वेडिंगसाठी राजस्थानला पसंती दिली आहे. राजस्थानमधील उदयपूर येथे हा भव्यदिव्य विवाहसोहळा पार पडणार असून या सोहळ्यामध्ये देशातील नव्हे तर जगातील नामांकित व्यक्ती हजर राहणार आहे.

उदयपूरमध्ये नुकत्याच झालेल्या या जोडीच्या संगीत सोहळ्यामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी धम्माल परफॉर्मन्स दिले. शाहरूख खान- गौरीपासून ते ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चनपर्यंत अनेक दिग्गज कलाकारांनी या सोहळ्याची रंगत वाढविली. शाहरूख आणि गौरीने ‘आया दिल्लीवाली गर्लफ्रेंड’ या बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका धरला. तर ऐश्वर्या- अभिषेकनेही तेरे बिना या गाण्यावर रोमॅण्टीक डान्स केल्याचं पाहायला मिळालं.

बॉलिवूडचे दोन खान शाहरुख आणि आमिर यांनीदेखील यावेळी एकत्र स्टेज शेअर करत डान्स केल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे हॉलिवूड स्टार बियॉन्से हिनेही लग्नात जोरदार परफॉर्मन्स दिला. या परफॉर्मन्ससाठी बियॉन्सेने १५ कोटी रूपये फी घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, इशा अंबानी आनंद पिरामलसोबत येत्या १२ डिसेंबर रोजी लग्नगाठ बांधणार आहे. आनंद आणि ईशा जुने मित्र असून आनंदने महाबळेश्वरच्या मंदिरात इशाला लग्नाची मागणी घातली होती. आनंदने हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. सध्या तो पिरामल इंटरप्रायजेसचा कार्यकारी संचालक आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood celebrities dance floor isha ambanis sangeet
First published on: 10-12-2018 at 12:01 IST