बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटींची लगीनघआई सुरु आहे असंच म्हणावं लागेल. सोनम कपूर मागोमाग नुकतीच अभिनेत्री नेहा धुपियासुद्धा विवाहबंधनात अडकली आहे. अतिशय खासगी पद्धतीत पार पडलेल्या विवाहसोहळ्यात नेहा आणि अंगद बेदीच्या मित्रपरिवारासोबत कुटुंबियांची उपस्थिती पाहायला मिळाली. नवी दिल्लीती पारंपरिक शीख परंपरांनुसार नेहा आणि अंगदची लग्नगाठ बांधली गेली.

बॉलिवूडची फॅशनिस्टा म्हणजेच अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा प्रियकर आनंद अहूजा यांची लग्नगाठही शीख विवाहपद्धतीनुसारच बांधण्यात आली. माध्यमांमध्ये या दोन्ही अभिनेत्रीच्या लग्नाच्या बऱ्याच चर्चा पाहायला मिळाल्या. ज्यामध्ये एका शब्दाचा उल्लेख वारंवार झाल्याचं पाहायला मिळालं. हा शब्द म्हणदे आनंद कारज.

शीख विवाहपद्धतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व असणारं हे आनंद कारज म्हणजे नेमकं आहे तरी काय असाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करु लागला. लग्नाच्या बंधनात दोन मनांसोबतच दोन कुटुंबही जोडली जातात हा महत्त्वाचा मुद्दा आनंद कारजच्या माध्यमातून लक्षात येतो. या विवाहपद्धतीमध्ये वधू आणि वराची जन्मपत्रिका जुळणं गरजेचं नसतं. हिंदू विवाहपद्धतीमध्ये लग्न, मुहूर्त या गोष्टींना फार महत्त्वं दिलं जातं. पण, शीख विवाहपद्धतीत मात्र हे चित्र काहीसं वेगळं आहे. धर्मगुरुच्या आस्थेच्या बळावरच आनंद कारजमध्ये म्हणजे शीथ संस्कृतीत लग्नगाठ बांधली जाते. त्याशिवाय हिंदूंप्रमाणे या लग्नसोहळ्यात सप्तपदी, सात फेरे वगैरे संकल्पना नसतात. सात ऐवजी चार फेरे घेत नवदाम्पत्य सहजीवनाच्या बंधनात बांधले जातात.

वाचा : ‘who added whom first?’- फेसबुकने जुळवलेल्या एका लग्नाची गोष्ट

अभिनेत्री नेहा धुपिया आणि सोनम कपूर या दोघींनीही अशाच पद्धतीने आपल्या वैवाहिक आयुष्याची सुरुवात केली. आनंद कारज ही एकंदर संकल्पना पाहता सोनम आणि नेहा या दोघींनीही लग्नात फक्त चारच फेरे घेतले असून, पारंपरिक विवाहसोहळ्यात त्यांनी आपल्या साथीदारासोबत एका नव्या प्रवासाची सुरुवात केली होती.