मुंबईजवळ तास दीडतासाच्या अंतरावर आपले एखादे फार्म हाऊस, वाडी, टुमदार बंगला, सेकंड होम असावे, या जीवनशैलीचा उगम पंचवीस-तीस वर्षांपूर्वीच झालाय व त्याला गती व ग्लॅमर चित्रपट तारे व क्रिकेटपटूंनी दिलयं. आणि त्यांचेही बरोबरच आहे. ही एक प्रकारची आर्थिक गुंतवणूक असतानाच काही दिवस विश्रांतीसाठी, पार्टीसाठी, पटकथालेखनासाठी जाता येते.
धर्मेंद्रने फार पूर्वीच लोणावळ्यात, तर राखीने पनवेलजवळील तारा गावात फार्म हाऊस आकाराला आणले. राखी तर अनेक वर्षे तेथे प्राणी-पक्ष्यांसोबत एकटीच राहायची. रणजीतने पेण एस. टी. स्टॅन्डपासून जवळच छान फार्महाऊस बांधल्यावर आपल्या ‘कारनामा’ या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळेस मुंबईतील आम्हा काही सिनेपत्रकारांना तेथे नेले होते.

त्या काळात अलिबाग, नागाव, चौल, मुरुड या परिसरात क्वचित कोणी चित्रपटाच्या शूटिंगला जाई. एन. चंद्रानी ‘युगंधर’चे मिथुन चक्रवर्ती-संगिता बिजलानी यांचे बरेचसे शूटिंग मुरुड परिसरात केले. तर राजदत्त दिग्दर्शित ‘मुंबईचा फौजदार’चे रविंद्र महाजनी-रंजना यांच्यावरचे ‘हा सागरी किनारा…’ गाणे सासवणेच्या समुद्र किनारी चित्रीत केले. गुलजार यांनी नागावच्या समुद्र किनारी सुनील शेट्टी-तब्बूवर बरेच महत्त्वाचे प्रसंग चित्रीत केले. इतरही काही उदाहरणे आहेत. दिग्दर्शक मुकुल आनंदने ‘इन्साफ’चे मांडवा जेट्टीवर शूटिंग केले आणि ‘अग्निपथ’मध्ये हाच मांडवा त्याने जणू व्यक्तिरेखा म्हणून दाखवला.


तेव्हा बंगला इत्यादीसाठी येऊर, लोणावळा, खंडाळा यानाच सेलिब्रेटीजची पसंती असे. अलिबाग म्हटलं की त्याना कसेसेच का वाटे समजेना. अश्विनी भावेचे गाव अलिबाग. नाडकर्णी आळीत तिचे नातेवाईक राहतात. नाना पाटेकर मुरुडचा. इतरही काही आहेत.
पूर्वी मराठीतील बरेचसे कलाकार नागाव, सासवणे, आवास, चौल येथे दोन दिवसाच्या सहलीसाठी जाऊ लागले आणि हळूहळू काहीनी छोटीशी वाडी घेण्यापासून सुरुवात केली. नेमक्या त्याच वेळेस म्हणजे १९९६साली ‘गेटवे ऑफ इंडिया’ ते मांडवा अशी लॉन्च सर्व्हिस सुरु झाल्यावर मध्यमवर्गीयांना सहलीचा हक्काचा स्पॉट मिळाला. नीतिश भारद्वाज याच मार्गाने अलिबागला जाऊ लागला. मोहन जोशी आवासचे निसर्ग सौंदर्य व कमालीची शांतता यांच्या प्रेमातच पडले व आवासला त्यांनी छोटी वाडी व घरच घेतले. तेही नवी मुंबई-पनवेल-पेण- पोयनाड अशा रस्ता मार्गाने न जाता सहकुटुंब समुद्रमार्गानेच जातात. आवासचे सरपंच राणे यांच्याशी त्यांचे अतिशय चांगले संबंध आहेत. स्थानिक गावकरी खूप सहकार्य करतात असाच मोहन जोशींचा अनुभव आहे. हळूहळू मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत या परिसराचे आकर्षण वाढत गेले. मुंबईपासून जवळच, छान निसर्ग सौंदर्य, नारळी फोफळीच्या वाड्या, समुद्र किनारा याची ओढ निर्माण झाली.
कोणी चित्रीकरणाला जाऊ लागले (क्षणभर विश्रांती, येडा हे चित्रपट येथे चित्रीत झालेत), कधी सहलीसाठी (तेजश्री प्रधान तर पावसाळ्यात येथे आपल्या मैत्रीणींसोबत येतेच). कोणी अलिबाग व मुरुडचा किल्ला पाह्यला येते. दरम्यान आणखीन काही गोष्टी घडल्या. किमी काटकर लग्नानंतर शंतनु शेवरे व आपल्या मुलासह बराच काळ अलिबागलाच राहिली.


सुष्मिता सेनने मांडवा जेट्टीजवळ फार्महाऊस घेतले तर थोडे पुढे अक्षय खन्ना असा सुखावला-विसावला की बराच काळ तो चित्रपटसृष्टीपासून दूरच राहिला. मुंबईतील तणाव, दगदग, धावपळीचा पुरता विसर पडण्याची ताकद रेवस-किहीम- चोंढी- सासवणे परिसरात आहे अशा गोष्टी लपत नाहीत. पण त्याच वेळेस या परिसरात जागांचे भाव देखील वाढले. टुमदार बंगले उभे राहिले. सचिन तेंडुलकरने नागावला प्रशस्त बंगला उभारून अनेक सेलिब्रेटीजना जोरदार पार्टी दिल्याची ग्लॅमरस छायाचित्रे मुंबईच्या वृत्तपत्रात पेज थ्रीवर झळकली. आमिर खानदेखिल अलिबागकर कधी झाला हे समजेलच नाही. अशी आणखीन नावे सांगताना एव्हाना तुमच्या डोळ्यासमोर शाहरुख खानचेही नाव आले असेलच. छोट्या खासगी यॉटने मांडवा ये-जा करणार्या शाहरूखच्या वाढदिवसानिमित्ताचे ताजे उदाहरण आहेच. सेलिब्रेटीज व सहलीनी सासवणे ते काशिद समुद्र किनारा या पट्ट्यातील शांतता भंग पावलीय. महागाई देखील वाढलीय. याचा स्थानिकांना त्रास वाढलाय ही याची दुसरी दुखरी बाजू आहे. आता तर भाऊचा धक्का ते मांडवा अशी रो रो लॉन्च सर्व्हिस सुरु झाल्यावर आणखीन रहदारी वाढेल. दिवसभरातील शूटिंगला येण्या-जाण्याचे प्रमाणही वाढेल. चोंढी-चेंढरेपासून भाटगल्ली-थेरोंडापर्यंत नवीन बंगले, फार्महाऊस वाढतील.

तुम्हाला कदाचित कल्पना नसेल. काही वर्षांपूर्वी दिग्दर्शक संजय गुप्ता याने चक्क ‘अलिबाग’ नावाचा चित्रपट सेटवर नेला. संजय दत्त प्रमुख भूमिकेत होता. पण संजूबाबाला मध्यंतरी पुन्हा जेलमध्ये जावे लागल्याने हा ‘अलिबाग’ नावाचा चित्रपट मागे पडला. पण यातून चित्रपटसृष्टीवरील या परिसराचा प्रभाव लक्षात येतोय ना? तेच तर महत्वपूर्ण आहे.
दिलीप ठाकूर