मराठी चित्रपसृष्टीतील विनोदाचे सम्राट म्हणून अशोक सराफ यांना ओळखलं जातं. मराठी चित्रपटसृष्टीत गेल्या कित्येक वर्षांपासून काम करणाऱ्या अशोक सराफ यांची अनेकांशी मैत्री आहे. तुम्हाला माहिती नसेल पण अशोक सराफ आणि नाना पाटेकर फार चांगले मित्र आहेत. दोघांमध्ये फार घट्ट मैत्री आहे. नाना पाटेकर यांना अशोक सराफ यांनी सुरुवातीच्या काळात खूप मदत केली आहे. ही मदत नाना पाटेकर अजून विसरलेले नाहीत. पण एकदा तर नाना पाटेकर यांनी अशोक सराफ यांना जमावापासून वाचवलं होतं. एका मुलाखतीत बोलताना अशोक सराफ यांनीच हा किस्सा सांगितला होता.

काय झालं होतं ?
“नाटक रद्द झाल्याने लोक मला मारण्यासाठी माझ्या मागे धावले होते. त्यावेळी नानाने मला तेथून पळवलं. थिएटरच्या मागच्या बाजूने गटारातून उडी मारुन आम्ही पळालो. मला घेऊन तो अक्षरश: धावत होता. ढकलण्याची जी रिक्षा असते ती त्याने थांबवली. तो स्वत चालवू लागला आणि मला घेऊन गेला. नाना पाटेकरने माझा जीव वाचवला आहे. नाही तर लोकांनी मला मारला असता,” अशी आठवण अशोक सराफ यांनी मुलाखतीत सांगितली होती.

नाना पाटेकर यांच्यासोबतच्या मैत्रीबद्दल बोलताना अशोक सराफ म्हणतात की, “नाना पाटेकर आणि माझा सहवास फक्त आठ महिन्यांचा होता. आम्ही एकत्र काम केलं होतं. एक दोन चित्रपट आम्ही सोबत केले. पण त्याला सहवास म्हणता येणार नाही. पण हमीदाबाईची कोठी नाटकाच्या निमित्ताने आम्ही आठ महिने एकत्र होतो. हमीदाबाईची कोठी दरम्यान त्याची आणि माझी इतकी घट्ट मैत्री झाली जी आजपर्यंत आहे. महत्त्वाचं म्हणजे नाना पाटेकरही ते मानणारा आहे त्यामुळे जास्त आहे. त्याला माझा स्वभाव आवडला आणि मला त्याचा स्वभाव आठवला. तो खडूस वाटतो, पण तसा तो नाही. तो सरळ आहे, फक्त स्पष्टवक्ता आहे. पण तो त्याचा गुणच आहे. मैत्रीला एकदम छान माणूस आहे. तुम्ही अडचणीत आहात सांगितलं तर तो केव्हाही मदतीला धावून येऊ शकतो. अंगावरचे कपडेही काढून देईल असा माणूस आहे”.

नाना पाटेकर यांनीदेखील एका कार्यक्रमात बोलताना अशोक सराफ यांनी केलेल्या मदतीचा उल्लेख केला होता. “हमीदाबाईची कोठी नाटक करताना मला ५० रुपये मिळायचे आणि अशोक सराफला २५० रुपये मिळायचे. त्याने मला पैशांची खूप मदत केली. मधल्या वेळात नाटक नसताना आम्ही पत्ते खेळायचो. त्यावेळी तो मुद्दामून माझ्याकडे पाच दहा रुपये हारायचा. मला कळायचं तो मुद्दामून करतोय. पण पैशांची गरज होती त्यामुळे मी सुद्धा घ्यायचो. एकदा गणपतीला माझ्याकडे पैसे नव्हते. तो फुलांचा सगळा खर्च कसा करायचा हा प्रश्न होता. सकाळी सहा साडे सहा वाजता अशोक फिल्मसिटीला शुटिंगला चालला होता. माटुंग्याच्या घऱी खिडकीवर टकटक केलं, माझ्या हातात एक कोरा चेक दिला. खात्यात १० हजार आहेत…तुला हवे तेवढे काढ असं म्हणून तो निघून गेला. मी तीन हजार रुपये काढले होते. काही वर्षानंतर आम्ही एका सिनेमात एकत्र काम करत होतो. त्यावेळी मी त्याला ते दिले”.