हिंदी चित्रपटसृष्टीत जुन्या चित्रपटांसोबतच त्या चित्रपटांतील गाण्यांचीही बरीच लोकप्रियता पाहायला मिळाली. काही जुनी गाणी तर आजच्या तरुणाईच्या गळ्यातील ताईतही आहेत. त्यापैकीच एक गाणं म्हणजे ‘क्या हुआ तेरा वादा’. ‘हम किसी से कम नही’ या चित्रपटातील हे गाणं खऱ्या अर्थाने संगीत क्षेत्रात एक वेगळं स्थान बनवून गेलं. आजही या गाण्यावर बरेच जण भान हरपून जातात. हे गाणं गाजण्याचं आणखी एक कारण म्हणजे त्याचं चित्रण. ‘क्या हुआ तेरा वादा’च्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या अभिनेत्याला चित्रपटांमध्ये एका टप्प्यावर अपयशाची अनुभूती झाली. एका टप्प्यानंतर तर त्याच्या नावाचाही उल्लेख फारसा पाहयला मिळाला नाही.
‘अमर उजाला’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार तारिक खान असं नाव असणारा हा अभिनेता परफेक्शनिस्ट आमिर खानचा भाऊ आहे. या गाण्याच्या निमित्ताने त्या काळी त्याची बरीच चर्चा पाहायला मिळाली होती. शिवाय त्याच्या चाहत्यांचा आकडाही चांगला वाढल्याचं पाहायला मिळालं होतं. ‘यादों की बारात’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या तारिक खान यांच्या कारकिर्दीत ‘हम किसी से कम नही’ हा चित्रपट मैलाचा दगड ठरली होता. म्युझिकल हिट ठरलेल्या या चित्रपटानंतरही त्यांचा चित्रपट क्षेत्रातील प्रवास सुरु होता. पण, त्यादरम्यान अशाच एका वळणावर एकाएकी त्यांचा चेहरा चित्रपटसृष्टीतून नाहीसा झाला. कोणालाही या अभिनेत्याबद्दल काहीच कल्पनाही नव्हती.
काही वर्षांपूर्वी या अभिनेत्याने स्वत:च यासंबंधीचा खुलासा केला. चित्रपटसृष्टीत एका टप्प्यावर आपल्याला असुरक्षित वाटू लागलं होतं, असं ते म्हणाले होते. याविषयीच सविस्तर माहिती देताना ते म्हणाले होते, ‘माझ्या मते मी त्या वळणावर होतो जेथे माझी कारकिर्द धोक्यात दिसू लागली होती. त्यामुळे मी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे करिअर स्थिरावेल असा माझा समज होता.’ सध्याच्या घडीला तारिक एका शिपमेंट कंपनीमध्ये सुपरवायझिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम पाहतात. चित्रपटसृष्टीपासून सध्या ते बरेच दूर गेले असून, कार्यक्रमांमध्येही फारसे दिसत नाहीत. झगमगाटाच्या या संपूर्ण विश्वातून तारिक खान यांनी स्वत:ला बरंच दूर ठेवलं आहे.