काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक- अभिनेता अनुराग कश्यप चर्चेत आला होता ते म्हणजे सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या काही फोटोंमुळे. आपल्यापेक्षा वयाने बऱ्याच लहान असणाऱ्या २३ वर्षीय शुभ्रा शेट्टी या तरुणीसोबत अनुरागने काही फोटो पोस्ट करत एक प्रकारे तिच्यासोबतच्या रिलेशनशिपची ग्वाहीच दिली होती. तेव्हापासूनच चौकटीबाहरेच्या कथानकांना रुपेरी पडद्यावर न्याय देणारा हा दिग्दर्शक त्याच्या खासगी आयुष्यामुळेही प्रकाशझोतात आला. मुळात अनुरागच्या आणि त्याच्या प्रेयसीच्या वयात जास्त अंतर असल्यामुळेही सोशल मीडियावर बऱ्याच चर्चा रंगल्या. ज्या सर्व चर्चांना अनुरागने एकाच ओळीत स्पष्ट उत्तर दिलं आहे असं म्हणायला हरकत नाही.
सहसा अनुराग आणि शुभ्रा या दोघांनीही त्यांच्या रिलेशनशिपविषयी उघडपणे वक्तव्यं करणं टाळलं. पण, ‘फिल्मफेअर’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने या नात्याविषयी वक्तव्य करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. शुभ्रासोबतच्या नात्याविषयी प्रश्न विचारला असता अनुरागने तिचं नाव न घेता एक गोष्ट स्पष्ट केली. ‘होय… मी रिलेशनशिपमध्ये आहे. बऱ्याच काळानंतर मी कोणासोबत तरी रिलेशनशिपमध्ये आहे. आणि याविषयी इतर कोणालाही काही घेणंदेणं असेल यावर माझा विश्वासच बसत नाहीये’, असं तो म्हणाला.
वाचा : पुरुष कलाकारांनी कमी मानधन आकारावं- दीपिका पदुकोण
आयुष्यात प्रेमाचं फार महत्त्वं असतं ही गोष्टी पटवून देत अनुराग म्हणाला, ‘आयुष्याच्या एका टप्प्यावर आपणही कोणावरतरी प्रेम करावं, प्रेमात असावं असं वाटतं. मला मुळाच प्रेम ही भावनाच खूप आवडते. वयाच्या नव्वदाव्या वर्षीही मी कोणावरतरी प्रेम करत असेन.’ अनुरागच्या या वक्तव्यामुळे प्रेमाच्या आणाभाका घेत असताना ‘ना उम्र की सीमा हो…’हे असं म्हटलं जातं ते खरंच यावर अनेकांचाच विश्वास बसला आहे.
‘मुक्काबाज’ फेम दिग्दर्शक अनुरागने या मुलाखतीत पूर्वाश्रमीची पत्नी कल्की कोचलीन हिच्यासोबतचं नातंसुद्धा सर्वांसमोर उघड केलं. कल्की आणि अनुराग वेगळे होऊन बरीच वर्षे उलटली असली तरीही त्यांच्यातील मैत्री आजही टिकून आहे. किंबहुना ते आजही एकमेकांच्या संपर्कात आहेत. कल्कीला तिच्या कामाचं संपूर्ण श्रेय न मिळाल्याबद्दल अनुरागने या मुलाखतीत खंतही व्यक्त केली. आपल्यामुळेच कल्कीला कलाविश्वात काम मिळत गेल्याचा अनेकांचाच समज आहे. पण, तसं काहीच नाहीये हेसुद्धा त्याने स्पष्ट केलं.