संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ या चित्रपटाविषयी असणारं कुतूहलाचं वातावरण आणखी काही दिवस तरी कायम असेल असं म्हणायला हरकत नाही. विरोध आणि आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यांमध्येही सध्या झपाट्याने वाढ होतेय. मुख्य म्हणजे चित्रपटातील कलाकार आणि खुद्द भन्साळींनी आता सुटकेचा नि:श्वास सोडला असून, चित्रपटाविषयी आता हे कलाकार मंडळी काही रंजक गोष्टी सर्वांसमोर आणत आहेत. सुरुवातीपासून अगदी शेवटच्या दृश्यापर्यंत प्रेक्षकांच्या अंगावर काटा उभा करणाऱ्या या चित्रपटातील एक दृश्य ‘सिंगल टेक’मध्ये चित्रीत करण्यात आलं होतं.

राणी पद्मावती साकारणाऱ्या दीपिकानेच याविषयीचा खुलासा केला. ‘गेल्या तीन महिन्यांमध्ये काय झालं यापेक्षा गेल्या तीन दिवसांमध्ये चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळाला, याकडेच मी जास्त लक्ष देतेय. चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल मी सर्वांचीच आभारी आहे’, असे दीपिका एका कार्यक्रमात म्हणाली. मलिक मोहम्मद जायसी यांच्या ‘पद्मावत’ या काव्यावर आधारित भन्साळींनी हा चित्रपट साकारला. ज्यामधील प्रत्येक दृश्यामध्ये त्यांनी बरेच बारकावे टीपल्याचे पाहायला मिळाले. अशा या चित्रपटातील क्लायमॅक्सचे दृश्य म्हणजे प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव देणारी कलाकृती.

राजपूत महिलांची गाथा आणि एका धाडसी संस्कृतीवर भाष्य करणाऱ्या या दृश्याविषयी सांगताना दीपिका म्हणाली, ‘चित्रपटातील जौहरचे दृश्य, ती उत्स्फूर्त वाक्यं सिंगल टेकमध्ये चित्रीत करण्यात आली होती. त्यावेळी मी ती वाक्य विसरेन असे मला वाटले होते. त्यासाठी मी बराच सरावही केला होता. त्या एका दृश्याच्या चित्रीकरणाच्या वेळी सेटवरही एक वेगळ्याच प्रकारचे वातावरण पाहायला मिळाले होते. सगळीकडे शांतता पसरली होती. ज्या दृश्याच्या चित्रीकरणासाठी तीन दिवस लागू शकतात ते आम्ही अर्ध्या दिवसातच आटोपले होते.’

Padmaavat Review : आश्चर्याच्या परिसीमा ओलांडणारा ‘पद्मावत’

राणी पद्मावतीची भूमिका साकारणाऱ्या दीपिकाने या चित्रपटासाठी बरीच मेहनत घेतली होती. रुपेरी पडद्यावर तिने साकारलेली धाडसी राणीची भूमिका फक्त प्रेक्षकांच्याच नाही, तर बी- टाऊनमधील काही दिग्गजांची मनंही जिंकून गेली आहे.