स्वच्छ भारत अभियान, स्वच्छतेचं वाढतं महत्त्वं आणि त्याचा देशाच्या प्रगतीमध्ये असणारा मोलाचा वाटा या गोष्टींवर प्रकाश टाकणारा ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी खिलाडी कुमार वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत आहे. मुख्य म्हणजे रिअॅलिटी शो आणि मोठमोठ्या कार्यक्रमांमध्येच हजेरी लावण्यासोबतच तो काही समाजोपयोगी कामांमध्येसुद्धा हातभार लावत आहे. फक्त चित्रपटाच्या प्रमोशनपुरताच स्वच्छ भारतचा नारा न लावता खिलाडी कुमार खऱ्या अर्थाने स्वच्छतेचं महत्त्व सर्वांपर्यंत पोहचवत आहे.
खिलाडी कुमारने त्याच्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये त्याने २४ तासांत २४ नवी शौचालयं सुरु करणार असल्याचं म्हटलं आहे. ‘काया कन्स्ट्रक्शन’ आणि टॉयलेट : एक प्रेम कथा यांच्या संयुक्त विद्यमाने विविध खेडेगावांमध्ये शौचालयांची बांधणी करण्यात आली आहे. याविषयी माहिती देण्यासाठी पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये खिलाडी कुमार म्हणाला, ‘स्वच्छ आझादीसाठी आणखी एक पाऊल पुढे टाकत काया कन्सट्रक्शनच्या साथीने आम्ही विविध ठिकाणी शौचालयांची बांधणी केली आहे. तेव्हा येत्या २४ तासांत माझ्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे या २४ ठिकाणच्या शौचालयांचं उदघाटन करण्यात येणार आहे. त्याची झलक तुम्ही माझ्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पाहू शकता.’
Stay tuned to my #Instagram story…over the next 24 hours we'll be unveiling one Toilet every hour! Watch #24Hours24Toilets! @ToiletTheFilm pic.twitter.com/GdUwEbJxGJ
— Akshay Kumar (@akshaykumar) August 7, 2017
वाचा : ….म्हणून अक्षयने तिचं कधीच ऐकलं नाही
सध्या चित्रपट वर्तुळातही खिलाडी कुमारच्या या चित्रपटाविषयीच्याच चर्चा रंगत आहेत. एका वेगळ्या विषयाला हात घालत या चित्रपटातून जया आणि केशवची अनोखी प्रेमकथा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेव्हा आता एका अनोख्या क्रांतीचा पायंडा पाडणारा हा चित्रपट रसिकांची दाद मिळवणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. खिलाडी कुमारच्या या चित्रपटाचं भविष्य येत्या काही दिवसांमध्ये कळेलच. पण, सध्यातरी त्याच्या इन्स्टा स्टोरी पाहण्यालाच अनेकांनी प्राधान्य दिलं आहे.