‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ या चित्रपटाचं नाव जितकं चर्चेचा विषय ठरत आहे तितकीच या चित्रपटातील गाणीसुद्धा चर्चेत येत आहेत. ‘हस मत पगली प्यार हो जाएगा’ या गाण्याच्या दोन्ही व्हर्जननंतर आता आणखी याच चित्रपटातील आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. खिलाडी कुमारने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुनच हे गाणं सर्वांच्या भेटीला आणलं आहे. भूमी पेडणेकर आणि अक्षय कुमार यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या ‘जग मे ना इश्क से बडा बखेडा’ असे बोल असणाऱ्या या गाण्यातून पुन्हा एकदा अक्षय आणि भूमीची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.

सुनिधी चौहान आणि सुखविंदर सिंग यांच्या आवाजातील या गाण्याला विकी प्रसादने संगीत दिलं असून, गरिमा- सिद्धार्थ या जोडीने हे गाणं लिहिलं आहे. या गाण्यात उत्तर भारतीय तरुणाची भूमिका साकारणारा खिलाडी कुमार त्याची भूमिका सुरेखपणे निभाताना पाहायला मिळत आहे. तर भूमीसुद्धा त्याला चांगलीच साथ देत आहे. शहरी राहणीमानापासून दूर ग्रामीण भागात प्रेमी जोडप्यांना एकमेकांना भेटण्यासाठी नेमके कोणते प्रयत्न करावे लागतात, त्यांची प्रेमकथा कशा प्रकारे फुलते यावर या गाण्यातून प्रकाश टाकण्यात आला आहे. खिडकीतून एकमेकांना पाहण्यापासून ते अगदी सर्वांच्या नजरा चुकवून एकमेकांची भेट घेण्यापर्यंतच्या शकला लढवल्याचंही यात पाहायला मिळत आहेत.

वाचा : रवीनाने अक्षय कुमारला ‘या’ अभिनेत्रींसोबत पकडलं होतं…

पत्रिकेत दोष असणाऱ्या एका मांगलिक मुलाला लग्न करण्यासाठी कोणकोणत्या रुढी- परंपरांना सामोरं जावं लागतं याचंही धमाल चित्रण या गाण्यातून पाहायला मिळत आहे. अक्षय, भूमीसोबतच चित्रपटातील इतर कलाकारांच्याही भूमिका अनेकांचीच मनं जिंकत आहे. तेव्हा आता हा बखेडा अक्षयसाठी कितपत फायद्याचा ठरणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. श्री नारायण सिंग दिग्दर्शित ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ हा चित्रपट ११ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्वच्छ भारत अभियान, स्वच्छतेची गरज आणि खेडेगावांमध्ये शौचालयांअभावी उद्भवणाऱ्या समस्या अशा विषयांवर हा चित्रपट भाष्य करणार आहे.